नगरसेवकांकडून पी.एम्.पी.एम्.एल्.च्या कारभारावर टीका

पुणे, २५ जुलै (वार्ता.) – ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या (पी.एम्.पी.एम्.एल्.च्या) कारभारावर आयोजित केलेली विशेष सर्वसाधारण सभा साडेदहा घंटे चालली. या सभेत पदोन्नतीमध्ये झालेला घोटाळा, कामगारांची निवृत्तीवेतन योजना, देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थेतील घोटाळे, महापालिका पी.एम्.पी.एम्.एल्.ला देत असलेली रक्कम या सर्व विषयांवर विरोधी पक्षांतील सर्वच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत टीका केली. वाढत्या आर्थिक तुटी, ढिसाळ कारभार आणि प्रवाशांना मिळणार्या निकृष्ट सेवांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. पी.एम्.पी.एम्.एल्.चे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्याकडून सविस्तर खुलासा झाला; पण तो समाधानकारक नसल्याचे नगरसेवकांनी सांगितले. शेवटच्या काही मिनिटांमध्ये झालेल्या गोंधळातून एवढी चर्चा करूनही नगरसेवकांनी उपस्थित केलेले पुणेकरांचे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले. सकाळी
११ वाजता चालू झालेली सभा रात्री १०.३० वाजता संपली. या सभेत अनेक नगरसेवकांनी महामंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढत कारभार सुधारण्याची आणि संचलन तूट अल्प करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
उत्पन्नाच्या तुलनेत व्यय दुप्पट
पी.एम्.पी.एम्.एल्.ला ठेकेदार, इंधनाचे देयक आणि अन्य व्ययाचा विचार केला, तर वर्षाला १ सहस्र ६१० रुपये व्यय होतो. बससेवेतून ८१८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. कर्मचार्यांच्या वेतनावर ७९० कोटी ७६ लाख रुपये व्यय होतात. भाडेतत्त्वावरील बससाठी ६१९ कोटी ७१ लाख आणि इंधनासाठी १०८ कोटी ७९ लाख रुपये व्यय होतात.
देणी थकीत
पी.एम्.पी.एम्.एल्.कडून ठेकेदारंचे मार्च ते जुलै या कालावधीतील १२९ कोटी रुपये थकले आहेत. ‘एम्.एन्.जी.एल्.’चे (महाराष्ट्र नैसर्गिक वायू मर्यादितचे) ६३ कोटी रुपये, कर्मचार्यांचे तोषदान (आर्थिक मोबदला) आणि रजा रोखीकरणाचे ५४ कोटी, वैद्यकीय देयकांचे १३ कोटी आणि बालसंगोपन अधिभाराचे १७ कोटी रुपये थकीत देणी आहेत.
संचलन तूट अल्प करण्याचा प्रयत्न
पी.एम्.पी.एम्.एल्.ने वर्ष २०२४-२५ मध्ये ११ कोटी ६७ लाख किलोमीटरचा प्रवास केला. त्या तुलनेत २०२५-२६ मध्ये १२ कोटी ८८ लाख किलोमीटरचा प्रवास केला. त्यातून महामंडळाची संचलन तूट ८८५ कोटी ४३ लाखांवरून ८०८ कोटी २६ लाखापर्यंत अल्प करण्यात प्रशासनाला यश आले.
शहरासाठी अधिकच्या बसगाड्यांची मागणी
शहराची लोकसंख्या १ कोटी ३ लाखांहून अधिक असून त्यासाठी किमान ६ सहस्र बसगाड्यांची आवश्यकता आहे. सध्या महामंडळाकडे १ सहस्र ९६४ बस असून १ सहस्र ३०६ बसेस भाडेतत्त्वावरील, ६५८ स्वत:च्या आहेत. पुढील काळात केंद्रशासनाकडून १ सहस्र इलेक्ट्रिक आणि या वर्षी १ सहस्र सी.एन्.जी. बसगाड्या रस्त्यांवर धावू लागतील.
महामंडळ हे पुणेकरांचे आहे ! – महापौर सौ. मंजुषा नागपुरे
पुणे महापालिका ही पी.एम्.पी.एम्.एल्.ची ६० टक्के भागधारक आहे. नगरसेवकांच्या सूचना आणि तक्रारी योग्य असून त्यांना गांभीर्याने घेणे हे प्रशासनाचे दायित्व आहे. महामंडळ हे प्रवाशांच्या हितासाठी असले पाहिजे. ही कुणाच्या घरची खासगी संस्था नाही, अशा शब्दांमध्ये महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला सुनावले.
पुणे येथे ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांचे ३१ जुलैला जाहीर व्याख्यान !
पुणे येथे पूर नियंत्रण कक्षात कर्मचारी नियुक्त नाही !
नियमांचे उल्लंघन करून प्रकल्पांना निधी दिल्यास त्या लेखाशीर्षाचा निधी थांबवणार !
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
महापुरुषांना जातीपातींमध्ये न अडकवता त्यांच्या विचारांचे जतन करा ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप