पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे (निवृत्त) यांचा आणि ‘डोंबिवली भूषण’ अन् ‘पद्मश्री’ गजानन माने यांचा सन्मान !

डोंबिवली, २६ जुलै (वार्ता.) – शत्रूच्या गोळ्यांचा वर्षाव चालू असतांना मृत्यूला समोरून भिडणार्या सैनिकांच्या छातीवर झळकणारे शौर्यचक्र हे केवळ धातूचे पदक नसते, तर ते देशासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाची साक्ष असते. हे पदक बाजारात विकत मिळणारे नसून रणभूमीवर केलेल्या अतुलनीय पराक्रमाची ती अमूल्य पावती असते. शरिराच्या विविध भागांत तब्बल ११ गोळ्या लागून पाय निकामी झाले, पोटातही गोळ्या लागल्या; मात्र मृत्यूला हरवून परतलेल्या पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे (निवृत्त) यांनी डोंबिवलीकरांसमोर सांगितलेल्या रणभूमीवरील थरारक अनुभवांनी उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे केले. ‘देशाने आपल्याला काय दिले ?’, असा प्रश्न विचारण्यापेक्षा ‘देशाने आपल्याला भरपूर काही दिले आहे’, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. देशासाठी बलीदान देणार्या सैनिकांचे शौर्य आणि त्याग यांचा आदर करणे हे प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे, असे प्रेरणादायी वक्तव्य ‘शौर्यचक्र’ सन्मानित पॅराकमांडो सुर्वे (निवृत्त) यांनी केले. ‘नमस्ते शौर्य फाऊंडेशन’च्या वतीने ‘कारगिल विजयदिना’च्या पूर्वसंध्येला डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत-मणिपूर’ या मोहिमांतील प्रत्यक्ष अनुभवकथनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या वेळी ‘डोंबिवली भूषण’ आणि ‘पद्मश्री’ गजानन माने, माजी सैनिक प्रवीण गमरे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, लेफ्टनंट कमांडर (निवृत्त) सुनील कांबळे, तसेच प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते अन् कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दुर्गेश परुळकर, ‘नमस्ते शौर्य फाऊंडेशन’चे सर्वेसर्वा विलास सुतावणे आणि संयोजक कुणाल सुतावणे यांच्यासह शेकडो देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ ‘अमर जवान’ प्रतिमेचे पूजन आणि पुष्प अर्पण करून करण्यात आला. पेंढारकर महाविद्यालयाच्या एन्.सी.सी. पथकाने मान्यवरांना मानवंदना दिली. त्या वेळी पॅरा कमांडो मधुसूदन सुर्वे (निवृत्त) यांचा अमर जवान प्रतिकृती, मानपत्र आणि स्नेहभेट देऊन सन्मान करण्यात आला.

‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित असलेले गजानन माने हे भारतीय नौसेनेतील माजी सैनिक ! वर्ष १९७१ च्या युद्धात त्यांनी पाकिस्तानचे कराची बंदर पूर्णपणे जाळल्यासाठी सैन्यातील ‘संग्राम’ पदक त्यांना मिळाल्यानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला. सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनी डोंबिवलीत कुष्ठरोग्यांसाठी काम केले. त्यानिमित्त त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ! – दुर्गेश परुळकर, प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते

‘युद्धस्य कथा रम्या: ।’ (युद्धाच्या कथा रमणीय असतात.) असे म्हटले जाते; मात्र युद्धभूमीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या सैनिकाच्या मुखातून त्या कथा ऐकतांना त्यांचे शौर्य आणि त्याग यांचा अभिमान अधिक तीव्रतेने जाणवतो. क्षात्रतेज आणि क्षात्रधर्माची शिकवण आपल्या संस्कृतीत आहे. सैनिक सीमेवर जीव धोक्यात घालून लढत असतात; म्हणून आपण घरात सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
मधुसूदन सुर्वे हे भारताचे आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व ! – डोंबिवली भूषण आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त गजानन माने

मधुसूदन सुर्वे हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहेत. मृत्यूच्या दाढेतून परत येऊनही देशसेवेची प्रेरणा देणार्या अशा सैनिकांच्या शौर्याला अभिवादन केले पाहिजे. ‘नमस्ते शौर्य फाऊंडेशन’ने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
कारगिल युद्धात मी मृत्यूच्या दाढेतून परतल्याचा अनुभव घेतला !पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे (निवृत्त) यांनी अनुभवकथनात सांगितले, ‘‘मला आसाम, नागालँड, जम्मू-काश्मीर, कारगिल, दक्षिण आफ्रिकेतील काँगो आणि मणिपूर येथे विविध लष्करी मोहिमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. कारगिल युद्धात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैनिकांनी शत्रूशी लढा दिला. वर्ष १९९९ मध्ये जवळपास १९ सहस्र फुटांवर झालेल्या कारगिल युद्धात आपल्याकडे अपुरी साधनसामग्री असतांनाही आपण पाकिस्तानशी लढलो. त्यात बरेच सैनिक विकलांग झाले, तर अनेकांना वीरमरण प्राप्त झाले. खरेतर आपण १४ जुलै या दिवशीच कारगिलवर विजय मिळवला होता; मात्र तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आदेशानुसार उर्वरित शत्रूंनाही शोधून मारले, तो दिवस २६ जुलै होता. त्यानंतर २० जून २००५ या दिवशी मणिपूरमध्ये झालेल्या ‘ऑपरेशन हिफाजत’मध्ये (भारतीय सैन्य आणि आसाम रायफल्स यांनी ईशान्य भारतात (विशेषतः त्रिपुरा आणि आसपासच्या भागात) चालवलेल्या आतंकवादविरोधी कारवायांचे सांकेतिक नाव) आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत माझ्या शरिराच्या विविध भागांत ११ गोळ्या लागल्या. माझे पाय निकामी झाले, तसेच पोटातही गोळ्या लागल्या. त्या रात्री मी मृत्यूच्या दाढेतून परतल्याचा अनुभव घेतला.’’ या शौर्यासाठी २६ जून २००६ या दिवशी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मधुसूदन सुर्वे यांना शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आले होते. ‘त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार असून तो प्रत्येकाने पहावा’, असे आवाहनही त्यांनी केले. |
सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा !
श्रीक्षेत्र कांदळी (ता. जुन्नर) येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमेचे आयोजन !
पुणे येथे ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांचे ३१ जुलैला जाहीर व्याख्यान !
मिरज येथे भक्तीमय वातावरणात ‘बाळगोपाळ दिंडी सोहळा’ उत्साहात !
नागपूर येथे अल्पवयीन मुलीचे धर्मांतर आणि निकाह !
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणी कुणाचीही सुटका होणार नाही ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री