गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित

श्रीमती प्रोमिला अग्रवाल यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रतिमा भेट देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

देहली – येथील साधक सौ. मंजुला कपूर आणि श्री. हरिश कपूर यांच्या निवासस्थानी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने २२ जुलै २०२६ या दिवशी देहलीतील सर्व साधकांसाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगाला देहली येथील साधक आणि मथुरा सेवाकेंद्रातील साधक उपस्थित होते.

सत्संगाच्या प्रारंभी साधकांनी त्यांचे अनुभव आणि गुरुपौर्णिमेनिमित्त करत असलेले भावप्रयत्न सांगितले. सत्संगाच्या शेवटी गुरुग्राम (हरियाणा) येथील श्रीमती प्रोमिला अग्रवाल यांना त्यांच्या रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमभेटीचे अनुभव सांगण्यास सांगण्यात आले. (श्रीमती प्रोमिला अग्रवाल जून २०२६ मध्ये गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाऊन आल्या होत्या.) त्यांचे अनुभव ऐकतांना सर्व साधकांची भावजागृती झाली. यानंतर सद्गुरु पिंगळे यांनी श्रीमती प्रोमिला अग्रवाल यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित केले.

या वेळी मार्गदर्शन करतांना सद्गुरु पिंगळे म्हणाले, ‘‘प्रोमिला अग्रवाल यांच्यामध्ये तीव्र शरणागतभाव आहे. अनुभव सांगतांना त्या एखाद्या लहान बालकाप्रमाणेच सांगत होत्या. डोळे मिटून पूर्ण अंतःकरणाने व्यक्त होत होत्या. त्यांची स्वतःची साधना करण्याची तळमळ तर आहेच, त्यासमवेत त्यांची ‘आपल्या मुलालाही गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) चरणांशी घ्यावे’, अशी तळमळ आहे, जी पुष्कळ दुर्मिळ आहे.’’

सद्गुरु पिंगळे यांनी श्रीमती प्रोमिला अग्रवाल यांचा सत्कार केल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करतांना त्या म्हणाल्या, ‘‘मी याच्या योग्य (पात्र) नाही. मी काहीच करू शकत नाही.’’


पतीनिधनाच्या दुःखद प्रसंगीही साधकांचा विचार करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या गुरुग्राम (हरियाणा) येथील श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) !

‘२९.११.२०२५ या दिवशी गुरुग्राम (हरियाणा) येथील श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांचे यजमान पुष्पेंद्र कुमार यांचे निधन झाले. त्या दिवशी मी प्रोमिलादीदींना भेटण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. यजमानांचे निधन झालेले असतांनाही साधकांशी बोलतांना त्या मनाने स्थिर होत्या. पतीचे शव समोर असतांनाही त्या साधकांचा पुष्कळ विचार करत होत्या. त्या प्रसंगी मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत. 

श्री. प्रणव मणेरीकर

१. स्वतः पतीनिधनाच्या दुःखात असूनही साधकांचा विचार करणे 

जेव्हा मी प्रोमिलादीदींना भेटलो, तेव्हा त्यांच्या समोर त्यांच्या पतीचा मृतदेह होता, तरीही त्या मला विचारत होत्या, ‘‘तुम्हाला निवासाच्या ठिकाणी काही अडचण नाही ना ?’’ (त्यांनी त्यांचे सरिता विहार (देहली) येथे असलेले दुसरे घर देहली येथील शंखनाद महोत्सवाची सेवा करणार्‍या सनातनच्या साधकांना रहाण्यासाठी ४ मास दिले होते.) स्वतः दुःखात असतांना ‘गुरुकार्यातील साधकांना काही अडचण नाही ना ?’, ही त्यांची विचारणा पाहून मला त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

२. साधकांप्रतीचा भाव 

दीदी तिथे आलेल्या त्यांच्या नातेवाइकांना माझी ओळख करून देतांना म्हणाल्या, ‘‘हे माझे गुरुबंधू आहेत. ते सरिता विहार (देहली) येथून आले आहेत.’’ त्यांच्या बोलण्यातून त्यांचा साधकांप्रतीचा आपलेपणा आणि भाव जाणवत होता.

३. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या अनुसंधानात असणे 

प्रोमिलादीदी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या संदर्भातील आठवणी सांगत होत्या. एकदा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव इंदूर (मध्यप्रदेश) येथील त्यांच्या घरी आले होते. ‘गुरुदेवांचे साधकांवर कसे प्रेम आहे ?’, हे त्या सांगत होत्या. त्या वेळी दीदींच्या बोलण्यात कृतज्ञताभाव जाणवत होता.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला अशा साधकांचा सहवास दिल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी त्यांच्या प्रीतीने सिद्ध केलेले साधक धन्य आहेत. ‘गुरुदेवांप्रमाणे माझ्यातही चराचराप्रती प्रीती निर्माण होऊ दे’, अशी मी श्री गुरुचरणी कृतज्ञताभावाने प्रार्थना करतो.’

– श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४६ वर्षे), मथुरा, उत्तरप्रदेश. (७.७.२०२६)                                               ०