साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. साधिकेने मुलाला दुचाकी चालू करण्यापूर्वी प्रार्थना करण्यास सांगणे 

‘काही दिवसांपूर्वी माझा मुलगा आणि पुतण्या चित्रपट पहाण्यासाठी प्रवेशिका आरक्षित करून आले होते. चित्रपट पहाण्यासाठी घरातून निघण्यापूर्वी बाहेर एक कुत्रा सतत ओरडत होता. त्यामुळे मला अस्वस्थ वाटले. थोड्या वेळाने मला अंतःप्रेरणेने ‘काहीतरी अप्रिय घडणार आहे’, असे तीव्रतेने जाणवले. मुलांना ‘चित्रपट पहायला जाऊ नका’, असे कसे सांगावे ?, हे मला समजत नव्हते. ते दोघे निघण्याच्या अगदी सिद्धतेत असतांना मी माझ्या मुलाला ‘दुचाकी चालू करण्यापूर्वी प्रार्थना कर’, असे सांगितले. ‘दुचाकी काळजीपूर्वक चालव आणि कोणत्याही परिस्थितीत समोरच्या वाहनाला ओलांडून (ओव्हरटेक करून) पुढे जाऊ नकोस’, असेही मी त्याला दोन वेळा अतिशय ठामपणे सांगितले. माझ्या मुलाला माझ्या बोलण्याचे आश्चर्य वाटले; कारण यापूर्वी त्याने अनेक वेळा दुचाकी चालवली आहे आणि मी त्याला अशा सूचना कधी दिल्या नव्हत्या.

सौ. बिजी सजीव

२. साधिकेने गुरुदेवांना प्रार्थना करणे 

ते दोघे निघून गेल्यानंतर मी माझे विचार गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी समर्पित केले आणि पूर्ण श्रद्धेने त्यांना प्रार्थना केली की, ‘गुरुदेवांनी त्या दोघांचे संपूर्ण प्रवासात रक्षण करावे.’

३. गुरुदेवांनी प्रवासात मुलांना सुरक्षित ठेवल्याचे साधिकेला जाणवणे  

सुमारे वीस मिनिटांनंतर, माझ्या मुलाचा मला भ्रमणभाष आला. त्याने सांगितले, ‘रस्त्यात एक लॉरी (मालवाहक गाडी) आणि एक चारचाकी यांचा अपघात झाला आहे. फुटलेल्या काचेचे तुकडे हवेत उडून आमच्या अंगावर पडले; पण आम्हाला काही लागले नाही. मी हळूहळू पुढे गेलो आणि रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे थांबलो. मी रस्त्याच्या मधेच अचानक दुचाकी थांबवली असती, तर मागून येणार्‍या गाडीची आम्हाला धडक बसली असती आणि मोठा अपघात झाला असता.’ हे ऐकल्यावर ‘गुरुदेवांनीच माझ्या मुलाला अचानक थांबण्याऐवजी पुढे जाण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या दैवी मार्गदर्शनामुळे एक मोठे संकट टळले. काचेचे तुकडे मुलांच्या अंगावर पडले, तरी त्यांना एकही ओरखडा आला नाही.

‘त्या दिवशी गुरुदेवांच्या कृपेने मुलांचे रक्षण झाले. त्याबद्दल मी त्यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी मला ती अपुरी वाटते.’

– सौ. बिजी सजीव, मलप्पुरम्, केरळ. (५.६.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक