सर्वांपर्यंत साधना पोचवण्याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (वय ६२ वर्षे) !

श्री. प्रदीप चिटणीस

१. अंगभूत सहजतेमुळे मनमोकळेपणाने बोलता येणे

‘श्री. प्रदीप चिटणीसकाका यांच्या वागण्या-बोलण्यात सहजता आहे. त्यामुळे मी त्यांना प्रथमच भेटायला गेल्यावर ‘त्यांना पहिल्यांदाच भेटत आहे’, असे मला वाटले नाही. त्यांचा चेहरा लहान मुलासारखा निरागस दिसतो. त्याच्या चेहर्‍यावर नेहमी हास्य असते. त्यामुळे त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येते. ते प्रत्येक भेटीत सर्वांना भरभरून आनंद देतात. एखाद्या विषयावर ते स्पष्टपणे बोलतात.

२. जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती

श्री. चिटणीसकाका यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के आहे. त्यामुळे ‘त्यांचा सत्संग मला आणि सहसाधिका यांना घ्यायचा आहे’, हे समजल्यावर मला पुष्कळ संकोच वाटत होता. सत्संगात विषय चालू असतांना ते त्यांच्या मनात येणार्‍या शंका शिकण्याच्या स्थितीत राहून आणि मोकळेपणाने विचारत.

३. ‘सर्वांपर्यंत साधना पोचावी’, अशी तळमळ असणे

सौ. भक्ती गैलाड

सत्संग ‘ऑनलाईन’ घेण्याचे ठरल्यावर काकांनी मला सांगितले, ‘‘माझ्या गायनाच्या शिकवणीवर्गाला येणारे विद्यार्थी, तसेच माझ्या संपर्कातील व्यक्ती यांना सत्संगाला जोडू शकतो.’’ ‘सत्संगाला जोडल्यामुळे साधनेविषयीची अधिक माहिती सर्वांना मिळेल’, असा त्यांचा विचार होता. ‘सर्वांना साधना सत्संगाला जोडणे शक्य व्हावे’, यासाठी त्यांनी सत्संगाची वेळ रात्रीची ठरवली. सत्संगाला आरंभ झाल्यानंतर ज्यांना काही कारणामुळे जोडणे शक्य नसायचे, त्यांना काका स्वतः संपर्क करत असत आणि त्यांची अडचण जाणून घेत. एखाद्या विद्यार्थ्याला सत्संगात सहभागी होण्यासाठी अडचण असल्याचे मला सांगतांना त्यांच्या मनात कोणतीही प्रतिक्रिया नसे. त्याविषयी ते सहजतेने सांगत असत.

४. स्वीकारण्याची वृत्ती

सत्संगाला जोडणारे काकांचे विद्यार्थी व्यस्त असल्यामुळे काही कालावधीनंतर हा सत्संग थांबवावा लागला. काकांना सत्संगाची ओढ होती; पण सत्संग थांबल्याचे त्यांनी सहजतेने स्वीकारले.

५. ‘विद्यार्थ्यांना शिकायला मिळावे’, यासाठी त्यांना रामनाथी आश्रमात नेणे

चिटणीसकाका अधूनमधून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जात असतात. एकदा त्यांना ‘स्वतःच्या समवेत इतरांनाही आश्रमात घेऊन जाऊ शकतो’, असे समजल्यावर त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना आग्रहपूर्वक आश्रमात नेले. ‘आश्रमाचा लाभ कसा होतो ? तेथे सगळे साधक कसे रहातात ?’, हे त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळावे. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा’, असा त्यांचा विचार होता. आरंभी त्यांतील काही विद्यार्थ्यांची आश्रमात जाण्याची सिद्धता नव्हती. नंतर त्या विद्यार्थ्यांनीही ‘आश्रमात आल्यानंतर चांगले वाटले. आनंद मिळाला’, असे सांगितले.

६. इतरांचा विचार करणे

काकांच्या गायनाच्या शिकवणीवर्गाला येणार्‍या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही, तरी त्याविषयी त्यांना ते कधी विचारत नाहीत. ‘त्यांना काहीतरी अडचण असू शकेल. ते शुल्क नंतर देतील’, असा त्यांचा विचार असतो.

७. सनातनचे अध्यात्माविषयीचे ग्रंथ पाहून काकांना आनंद होतो. त्यांनी सनातनचे अनेक ग्रंथ विकत घेतले आहेत.

८. भाव

८ अ. देवाप्रतीचा भाव

१. काही कालावधीपूर्वी चिटणीसकाकांचे हृदयाचे शस्त्रकर्म झाले. त्या वेळी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले होते. तेव्हा काकांनी गायनाचा शिकवणीवर्ग त्यांच्या जुन्या विद्यार्थ्यांवर सोपवला. ‘ईश्वर आहे. तो सगळे बघणार आहे’, असा त्यांचा भाव होता.

२. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने करण्यात येणार्‍या संगीताविषयीच्या विविध प्रयोगांच्या वेळी चिटणीसकाका गायनाची सेवा सादर करतात. काही वेळा ते २ ते ४ घंटेही वेगवेगळ्या पद्धतींनी गाऊ शकत. याविषयी त्यांनी सांगितले, ‘‘मी हे कसे गाऊ शकतो ’, याचे मलाच आश्चर्य वाटते. ही देवाची कृपा आहे.’’

८ आ. प.पू. देवबाबा यांच्याप्रतीचा भाव : चिटणीसकाकांचा प.पू. देवबाबा (संस्थापक, शक्तीदर्शन योगाश्रम, किन्नीगोळी, कर्नाटक) यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. त्यांना प.पू. देवबाबांच्या आश्रमात रहाण्याची आणि गायनाची संधी मिळाली. त्याविषयी सांगतांना त्यांच्या डोळ्यांमध्ये ‘जणू आपण कोणत्यातरी वेगळ्या विश्वात राहून आलो आहोत’, असा भाव होता. त्या वेळी त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळा अनुभव घेतल्याचा आनंद दिसत होता.

८ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : बोलतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा विषय निघाला की, काका निःशब्द होत असत. त्यांच्याविषयीचा भाव काका शब्दांत व्यक्त करू शकत नसत.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझी चिटणीसकाकांशी भेट घालून देऊन मला त्यांच्याकडून विविध गुण शिकण्याची संधी दिली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. भक्ती गैलाड, ठाणे (२४.७.२०२६)