बांदोडाच्या ग्रामसभेत फर्मागुडी येथील ‘आय.आय.टी.’ला विरोध

(आय.आय.टी. – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – भारतीय तंत्रज्ञान संस्था)

फोंडा, २६ जुलै (वार्ता.) – फर्मागुडी येथील प्रस्तावित आय.आय.टी. प्रकल्पाला बांदोडा पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांकडून विरोध दर्शवण्यात आला. ‘गाव आणि गावपण नष्ट करणारा हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रहित झाला पाहिजे’, असा पवित्रा काही उपस्थित ग्रामस्थांनी घेतला. कायदेशीर गोष्टी पुढे करून हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाल्यास उच्च न्यायालय किंवा सर्वाेच्च न्यायालयात जाऊ, अशी चेतावणी या ग्रामसभेत देण्यात आली.

या वेळी दिनेश गावणेकर यांनी आय.आय.टी. प्रकल्पाच्या विरोधात सूत्रे मांडली. ते म्हणाले, ‘‘कटमगाळदादाची (स्थानिक क्षेत्रपाल देवतेची) जागा असलेला डोंगरमाथा गावासाठी महत्त्वपूर्ण आहे. तो नैसर्गिक जलस्रोतांचा महत्त्वाचा दुवा आहे. तिथून येणारे पाणी आमची शेती-बागायती आणि इतर कामांसाठी उपलब्ध होते. तिथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झाल्यास कूपनलिका खोदल्या जातील आणि परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांतील पाणी शोषले जाईल. परिणामी गावात पाणी येणार नाही.’’ त्यानंतर दिनेश गावणेकर यांनी कटमगाळदादा असलेली भूमी वारसा भूमी म्हणून अधिसूचित करावी, असा ठराव घेण्याची मागणी केली. ही जागा संरक्षित क्षेत्र म्हणून नोंद केली जावी, अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली.