वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडणार्‍यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार !

वारकर्‍यांच्या मागण्यांसाठी पंढरपूर येथे ‘वारकरी महाअधिवेशन’ !

१ सहस्रपेक्षा अधिक वारकरी आणि हिंदु भाविक यांची उपस्थिती !

पंढरपूर – वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा कणा असून महाराष्ट्र जोडण्याची शक्ती या संप्रदायात आहे. काही निधर्मी, साम्यवादी , पुरोगामी महाराष्ट्राला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. वारकरी संप्रदाय सर्वसमावेशक असून त्याने वेळोवेळी समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. धर्मनिष्ठ अशा वारकरी संप्रदायात ‘वारकरी आणि हिंदु धर्म वेगळा’ असे भासवण्याचे षड्यंत्र चालू आहे. वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडण्याचे कटकारस्थान करणार्‍यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार वारकरी महाअधिवेशनात करण्यात आला. वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठ येथे २५ जुलै या दिवशी ‘वारकरी महाअधिवेशन’ आयोजित केले होते.

‘श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला’चे महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनासाठी १ सहस्रपेक्षा अधिक वारकरी आणि हिंदु भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. धनंजय बोकडे यांनी केले, तर श्री. विनोद रसाळ यांनी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला.

या प्रसंगी इंचगिरी मठाचे मठाधिपती सुदर्शन महाराज, ‘राष्ट्रीय वारकरी परिषदे’चे ह.भ.प. रामदास महाराज चौधरी, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.


संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती देऊन जाहीर सन्मान !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली

अधिवेशनात वारकरी संप्रदायातील हिंदुत्वासाठी कार्य करणारे ह.भ.प. आणि पूजनीय संत यांना ‘घुसखोर’ संबोधून त्यांचा अवमान करणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांचा जाहीर निषेध करण्यात आला, तसेच हिंदुत्वनिष्ठ, संत यांचा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती देऊन जाहीर सन्मान करण्यात आला. ‘संत सोपानकाका सहकारी बँके’चे अध्यक्ष, तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी आमदार संजय जगताप यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या २० मूर्ती उपस्थितांना भेट देण्यासाठी अर्पण म्हणून दिल्या.

विशेष सन्मान

हुपरी (कोल्हापूर) येथे निवेदन, तसेच विविध मार्गाने आंदोलन करून अवैध मदरसा तोडण्यास भाग पाडणारे श्री. नितीन काकडे, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनाच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे श्री. गणेश लंके, गोरक्षणासाठी सातत्याने काम करणारे राष्ट्रीय वारकरी सेनेचे उपाध्यक्ष ह.भ.प अंभोरे महाराज कारभारी यांचा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण !

या अधिवेशनाचे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ‘फेसबुक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ची ‘यू ट्यूब’ वाहिनी यांवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.


हिंदूंनी शत्रूबोध लक्षात घेऊन धर्मावरील आघातांच्या विरोधात कृतीशील व्हावे !- महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज, श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट, सरला


हिंदू इतिहासातून शिकत नाहीत आणि संघटितही होत नाहीत. त्यामुळेच अनेक आक्रमकांनी भारतावर राज्य केले. धर्मावरील आघातांविरोधात हिंदू जागृत नसल्याने अन्य धर्मीय आणि चुकीचे विचार पसरवणारे यांचे फावते. वारकरी संप्रदाय जगाला देण्याचे आणि जोडण्याचे काम काम करतो. अशा संप्रदायाविषयी भ्रमित करणारे विचार पसरवले जात आहेत. ‘समता’ दिंडी काढली जात आहे. आज काही जण पंढरपूरचा पांडुरंग हा विठ्ठल नसून अन्य कुणीतरी असल्याचे सांगत आहेत. हिंदूंनी इतिहासबोध आणि शत्रूबोध लक्षात घेऊन या आघातांच्या विरोधात कृतीशील व्हायला हवे.

जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे सनातन धर्म ! लोकांना हिंदु धर्माचे महत्त्व न समजल्याने ते अन्य धर्मांकडे वळत आहेत. ‘लव्ह जिहाद’चे लोण प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत पोचले आहे. लहान मुलांचाही बुद्धीभेद करून त्यांना इस्लामच्या प्रार्थना शिकवल्या जात आहेत. गोवंश रक्षणाच्या संदर्भात सरकारने मे महिन्यात अध्यादेश काढला होता. एखाद्या परिसरात अवैधरितीने गोहत्या झाल्यास त्याला पोलीस, तहसीलदार, प्रशासन तितकेच उत्तरदायी आहेत ! हे लक्षात घेऊन प्रशासनास गोहत्या थांबवण्यासाठी भाग पाडले पाहिजे.

मान्यवर वक्त्यांनी जाज्वल्य भाषणातून जागवले वारकर्‍यांमधील धर्मप्रेम !

आपण प्रथम वैदिक सनातनी हिंदु आहोत, मग वारकरी आहोत ! – ह.भ.प. महेंद्र महाराज म्हस्के, प्रवक्ते, राष्ट्रीय वारकरी परिषद

सध्या देव, देश, धर्म यांच्यापुढे सध्या मोठी आव्हाने आहेत. संप्रदायासाठी काम करणारे अनेक लोक धर्माच्या व्यासपिठावर येऊन स्वतःचे मत व्यक्त करण्यास घाबरतात; मात्र वारकरी संप्रदायाचे वेदांताचार्य वैकुंठवासी गुरुवर्य प.पू. निवृत्ती महाराज वक्ते यांनी सांगितल्याप्रमाणे ‘अगोदर आपण वैदिक सनातनी हिंदु आहोत, मग वारकरी आहोत’, हे नेहमी लक्षात ठेवावे. वारीतील शिस्त जागतिक पातळीवर वाखाणली जाते. अशा वारकरी संप्रदायात सर्वधर्मसमभावाचे विष पेरण्याचे आणि वारकरी अन् हिंदु धर्म वेगळा भासवण्याचे षड्यंत्र चालू आहे.

विविध ठरावांना ‘हर हर महादेव’च्या गजरात पाठिंबा !

पंढरपूर येथील पुरातत्त्व विभागाच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील ‘रासायनिक लेपन प्रक्रिया’ या धर्मविरोधी निर्णयाच्या विरोधात वारकरी आणि मंदिर महासंघ यांनी लढा दिला. यापुढील काळात कोणत्याही प्रकारची रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये यांसह संत, संत-वाङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ‘ईशनिंदा प्रतिबंधक कायदा’ लागू करावा, प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’ स्थगित असून यापुढे सरकारने देवभूमीचे रक्षण करणारा ‘देवस्थान भूमी संरक्षण कायदा’ लागू करावा यांसह करण्यात आलेल्या विविध ठरावांना वारकरी-भाविक यांनी ‘हर हर महादेव’च्या गजरात पाठिंबा दिला.

हिंदु धर्मावरील आघातांना हिंदूंचा असंघटितपणा कारणीभूत ! – ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने-शास्त्री, अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

अन्य धर्मीय संघटित असल्याने त्यांच्या प्रत्येक मागण्यांची नोंद शासनाला घ्यावी लागते. हिंदू संघटित नसल्यानेच हिंदु धर्मावर आघात होत आहेत. गोमातेला राज्यमातेचा दर्जा असतांना पशूवधगृहाची अनुमती दिली जाते, हे दुर्दैवी आहे.

वारकरी संप्रदायात घुसलेले कथित कीर्तनकार शोधणे आवश्यक ! – ह.भ.प. नारायण महाराज शिंदे, विश्व हिंदु परिषद

वारकर्‍यांच्या भोळेपणाचा अपलाभ घेऊन काही लोक त्यांना आमीषे दाखवून त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. प्रसारमाध्यमांनीही श्रीराममंदिराची अपकीर्ती होईल, अशी वृत्ते दाखवली. यापुढील काळात वारकरी संप्रदायात घुसलेले (मनाने पुरोगामी असलेले) कथित कीर्तनकार शोधून त्यांना समोर आणणे आवश्यक आहे.

हिंदूंच्या न्यायालयीन लढाईद्वारे वज्रलेपनाला स्थगिती ! – प्रसाद पंडित, पीठासीन धर्माधिकारी, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ, अक्कलकोट

वज्रलेपनाच्या संदर्भातील माहितीत फोलपणा असूनही जाणीवपूर्वक मंदिरे समितीने वज्रलेपन करण्याचा अट्टहास केला. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि वारकरी संप्रदाय यांनी पत्रकार परिषद घेऊन यातील फोलपणा समोर आणला, तसेच न्यायालयीन लढाईद्वारे वज्रलेपनाला स्थगिती मिळवली.

हिंदू कुटुंबाने त्यांचा एकतरी मुलगा धर्माच्या कामासाठी अर्पण करावा ! – दादा वेदक, केंद्रीय सहमंत्री, विश्व हिंदु परिषद

देव, देश, धर्म यांवरील आघातांच्या विरोधात वारकर्‍यांनी आवाज उठवला पाहिजे. वारकरी संप्रदायाची भक्ती, समर्पण, त्याग न्यून होता कामा नये. वारकरी संप्रदाय समाजमूल्य जतन करण्यासाठी प्रयत्नरत आहे. सध्या कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्था यांवर घाला घालण्याचे काम चालू आहे. समाज आणि राष्ट्र यांना जोडणारा दुवा म्हणजे कुटुंबव्यवस्था ! ती आदर्श म्हणून उभी केली पाहिजे. हिंदु कुटुंबाने त्यांचा एकतरी मुलगा धर्माच्या कामासाठी अर्पण केला पाहिजे.

श्रीराममंदिराविषयी अनेक असत्य वृत्ते समोर आणली गेली. दान चोरी प्रकरणात अटकेत असलेले ८ जण ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे कर्मचारी आहेत. हा घोटाळा प्रामुख्याने बँकेच्या दुर्लक्षितपणामुळे झालेला आहे. अयोध्या येथील श्रीराममंदिरात मोठा अपहार झाला, असे कुभांड रचले गेले. सध्या या सर्वांच्या संदर्भात देखरेख करण्यासाठी संतांची समिती नेमण्यात आलेली आहे. झालेल्या घटनेमुळे भाविकांच्या मनातील श्रद्धा कुठेही अल्प झाली नसून अयोध्या येथे भाविकांचा ओढा कायम आहे.

तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त आणि नद्या स्वच्छ होण्यासाठी सरकारने पावले उचलावीत ! – ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर, प्रवक्ते, राष्ट्रीय वारकरी परिषद

महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला; मात्र हा कायदा कठोर केला पाहिजे. सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त झाली पाहिजेत. इंद्रायणी, चंद्रभागा या नद्याही स्वच्छ व्हायला हव्यात. उपाहारगृहांना देवता किंवा राष्ट्रपुरुष यांची नावे देऊ नयेत. त्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत.

वारकरी संप्रदायात घुसलेले ‘खरे घुसखोर कोण ?’ हे सांगण्याची वेळ आली आहे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

सुनील घनवट

संघटित असलेल्या वारकरी संप्रदायात हेतूपुरस्सर दुफळी पाडण्याचे आणि त्यांचा जाणीवपूर्वक बुद्धीभेद करण्याचे काम चालू आहे. श्री विठ्ठलभक्तीचे वर्णन करणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे अनेक अभंग असतांना जाणीवपूर्वक ‘अल्लाविना कुणी श्रेष्ठ नाही’, ‘अल्ला दिलावे-अल्ला खिलावे’, अशा प्रकारचे एकांगी प्रसार करणारे फलक वारीच्या वाटेवर लावले जात आहेत. हे षड्यंत्र वेळीच हाणून पाडले पाहिजे. वारकरी संप्रदायात घुसलेले खरे घुसखोर कोण आहेत ? हे सांगण्याची आता वेळ आली आहे. महाराष्ट्रासाठी वारकरी संप्रदाय ‘प्राण’ असून हिंदु धर्म हा ‘आत्मा’ आहे. निधर्मी आणि पुरोगामी यांना इतकाच पुतळा असेल, तर पुढील वर्षी वारीच्या काळात प्रत्येक मशिदीत ज्ञानोबा-तुकारामांची आरती करण्याची धाडस त्यांनी दाखवावी.

देहलीतील ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलनात ‘प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधातील आंदोलनाच्या नावाखाली पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या, तसेच पोलिसांवर आक्रमण करण्यात आले. तिथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या वेळी देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. हे देशविरोधी षड्यंत्र लक्षात घेऊन त्याविरोधात कृती करण्याचा निर्धार केला पाहिजे.

देशातील युवा पिढी व्यसनाधीन करण्याचे मोठे षड्यंत्र सध्या चालू आहे. केवळ मुंबई-पुणे नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातही हुपरी-इचलकरंजी अशा लहान-लहान शहरांत अमली पदार्थाचे व्यसन वाढत आहे. त्यामुळे ‘अमली पदार्थ जिहाद’ रोखण्यासाठीही कार्य करावे लागेल. महाराष्ट्र सरकारने धर्मांतरविरोधी, ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत केला आहे; मात्र तो अद्याप लागू केलेला नाही. ‘हा कायदा तात्काळ लागू करावा’, अशी मागणी आहे.

संपादकीय भूमिका

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात संघटित होणारे वारकरी ही धर्माची शक्तीच !