प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष

देशद्रोही उमर खालिद याच्या समर्थनार्थ फलक झळकवल्याचे प्रकरण

मुरगाव – ‘नीट’ परीक्षेसंदर्भात गोव्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात काही आंदोलकांकडून उमर खालिद याच्या समर्थनार्थ फलक झळकवल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे या आंदोलनाच्या मूळ उद्देशाविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा यांचे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी दिली आहे.

नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांचे प्रश्न किंवा शैक्षणिक मागण्या आणि उमर खालिद याचे समर्थन यांचा नेमका काय संबंध आहे ? हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनात अशा प्रकारच्या राजकीय किंवा वैचारिक घोषणांना स्थान देण्यामागील उद्देश स्पष्ट करण्यात यावा, अशी मागणी श्री. फळदेसाई यांनी केली.

श्री. फळदेसाई यांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन यांना आवाहन केले की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांविरुद्ध विद्यमान कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांचा वापर कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा वैचारिक अजेंडा (कार्यसूची) पुढे नेण्यासाठी होऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा राज्यातील विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांना पाठिंबा देत असले, तरी अशा आंदोलनांच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण करणारे किंवा असंबंधित राजकीय संदेश देण्याच्या प्रयत्नांना विरोध करत राहील, असेही श्री. नितीन फळदेसाई यांनी स्पष्ट केले.