१. रशियाने युद्धाची पूर्वसिद्धता करून ठेवल्यामुळे त्याला युद्धाचे परिणाम भोगण्यास वेळ लागणे
‘रशिया-युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे रशियाचे चलन ‘रुबेल’चा दर अनुमाने ५० टक्क्यांहून खाली आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्यांना आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. युद्ध चालू झाल्यापासून रशियाच्या शेअर बाजाराची (‘स्टॉक एक्स्चेंज’ची) किंमत ९० टक्क्यांहून अल्प झाल्यामुळे ती पूर्णपणे बंद आहेत. रशियाच्या आस्थापनांची युरोपमधील विविध शेअर बाजारामध्ये नोंदणी झालेली असते, तेथे त्यांची किंमत ७० ते ८० टक्के एवढी खाली आली आहे. युरोपची बहुतेक राष्ट्रे त्यांच्याशी व्यापार करण्यास अइच्छुक आहेत. रशियाचा सर्वांत मोठा व्यापार हा वायू आणि तेल यांच्या विक्रीतून होतो. त्यांची खरेदी करण्यास कुणीही सिद्ध नाही. याखेरीज रशियामध्ये होणारी थेट विदेशी गुंतवणूकही आता थांबलेली आहे. युद्धामुळे होणार्या प्रचंड मोठ्या व्ययासाठी तेवढाच पैसाही आवश्यक आहे. यासमवेतच पाश्चात्त्य देशांनी रशियावर जे आर्थिक निर्बंध लावलेले आहेत, त्यांचाही रशियावर निश्चित परिणाम होत आहे. असे असले, तरी रशियाने या युद्धासाठी आधीच सिद्धता करून ठेवलेली होती. त्याने ‘रुबेल’ आणि ‘डॉलर्स’ (अमेरिकेचे चलन) यांचा साठा करून ठेवला होता, तसेत मोठ्या प्रमाणात सोने बनवून ठेवले होते. याखेरीज चीन रशियाला साहाय्य करत आहे. त्यामुळे त्याच्यावर युद्ध थांबवण्याएवढा परिणाम सध्या तरी दिसत नाही. अशा आर्थिक निर्बंधांचे पुष्कळ दूरगामी परिणाम होत असतात. असे असले, तरी रशियावर दबाव वाढल्याने तो युद्ध थांबवेल, अशी शक्यता सध्यातरी दिसत नाही.
असे म्हटले जाते की, जगात अमेरिका, चीन, युरोपीय संघ यांच्यानंतर रशिया हा जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. रशिया हा जगापासून एकटे पडणार आहे. त्यामुळे येणार्या काळात रशियाची अर्थव्यवस्था निश्चितच बिघडत जाणार आहे. याचा परिणाम रशियाच्या लोकांवर होत आहे. रशियाचे लोक ‘एटीएम्’च्या बाहेर रांगा लावून उभे आहेत. ते मोठ्या प्रमाणात पैसे परत घेत आहेत. आपण आकडेवारी पाहिली, तर १.५ ट्रिलीयन डॉलर्स एवढे पैसे रशियाच्या लोकांनी त्यांच्या बँकांमधून काढले आहेत, म्हणजे युद्धाचा परिणाम निश्चित होत आहे.
२. अंतराळातील उपग्रह उडवून देण्याची रशियाची धमकी आणि त्याचा होणारा परिणाम
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी धमकी दिली आहे, ‘‘हे युद्ध थांबले नाही आणि त्यांना हवे ते मिळाले नाही, तर अंतराळामध्ये असलेली उपग्रहे उडवून देऊ.’’ अंतराळामध्ये दळणवळण, टेहाळणी करणे आणि ‘जीपीएस्’ यांच्यासाठी उपग्रहाचा उपयोग होतो. सध्या या उपग्रहांवर आधुनिक युद्ध प्रचंड अवलंबून असते. या युद्धाला साहाय्य करणारा उपग्रह बंद पाडण्यात आला, तर युद्धाच्या क्षमतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. रशियाकडे उपग्रह पाडण्याची शस्त्रे किंवा क्षेपणास्त्रे आहेत, तशी ती अमेरिका आणि भारत यांच्याकडेही आहेत. सध्या अंतराळामध्ये युद्ध करणे, हे संयुक्त राष्ट्रांच्या नियमांच्या विरुद्ध आहे. असे जरी असले, तरी रशिया उपग्रह बंद करू शकतो किंवा उपग्रहाची काम करण्याची यंत्रणा बंद पाडू शकतो अथवा त्याची दिशा पालटू शकतो. रशियाने तसे केले, तर युद्धावर मोठा परिणाम होईल, यात शंका नाही. हीच क्षमता पाश्चात्त्य देश किंवा युरोप यांच्याकडेही आहे. यापुढे अंतराळामध्ये युद्ध झाले, तर केवळ रशियासाठीच नाही, तर तर संपूर्ण जगासाठी अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण होईल.
ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने पुतिन यांना ‘पार्किन्सन्स’ नावाचा आजार असल्याचे म्हणणे, हे मानसिक युद्ध !ब्रिटनच्या ‘एम्आय ६’ या गुप्तचर यंत्रणेने पुतीन यांना पार्किन्सन्स नावाचा आजार असल्याचे म्हटले आहे. ‘पार्किन्सन्स’ (कंपवात) या आजाराचे अनेक दुष्परिणाम आहेत. तो वाढला तर व्यक्तीच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. पुतिन यांना खरोखरंच हा रोग झाला आहे कि नाही ? कि हेही एक मानसशास्त्रीय युद्ध आहे ? सध्याच्या युद्धात मानसिक किंवा माहिती युद्ध यांचा दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आपण पुतिन यांना पहातो, तेव्हा ते शारीरिकदृष्ट्या अतिशय तंदुरुस्त वाटतात. त्यांची शारीरिक तंदुरुस्ती ही जगातील कोणत्याही राष्ट्रप्रमुखापेक्षा चांगली आहे. त्यामुळे त्यांना ‘पार्किन्सन्स’ हा आजार झाला असेल, असे वाटत नाही. एवढे मात्र नक्की की, ‘एम्आय ६’ किंवा जगातील अन्य गुप्तेहर संघटना पुतिन यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून असतात. ते कसे बोलतात ? कसे चालतात ? त्यांचा उजवा किंवा डावा हात का हालत नाही ? अशा प्रकारच्या अनेक चित्रफिती आपल्याला संकेतस्थळावर दिसतील. पुतिन हे अतिशय बलवान आणि क्रूर असे व्यक्तीमत्त्व आहे. अर्थात्च ते आजारी पडले, तर त्याचा युद्धावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ‘सर्वाेच्च सेनापती तंदुरुस्त नसेल, तर आम्ही लढाई कशासाठी करायची ?’, अशा प्रकारे रशियाच्या जनतेच्या मनावर दबाव टाकता येऊ शकतो. हे खरे आहे कि नाही ? हा येणारा काळच सांगेल; पण एवढे निश्चित की, मानसिक किंवा माहिती युद्ध सध्याच्या काळात अतिशय महत्त्वाचे आहे. या पुढील काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किती आजारी आहेत ? आणि त्यांना कसे बोलता येत नाही ? अशा गोष्टी कुणी पसरवल्यास आश्चर्य वाटायला नको; कारण हा सर्व मानसिक युद्धाचा एक फार मोठा भाग आहे. |