असे होत असेल, तर त्या वाहनाचा इंधन खर्च त्यांच्याकडून वसूल करून घ्यायला हवा ! – संपादक
सातारा, १३ मार्च (वार्ता.) – येथील जिल्हा हिवताप अधिकारी घरातून कामकाज पहात आहेत. त्यांना कामकाजासाठी दिलेले शासकीय वाहन ते घरगुती कामांसाठी उपयोगात आणत आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडेकर यांनी केला आहे.
वाडेकर म्हणाले, ‘‘सातारा जिल्ह्याचे हिवताप कार्यालय गुरुवार पेठेतील जुन्या दवाखान्याच्या परिसरामध्ये आहे. या कार्यालयासाठी सक्षम अधिकारी नाहीत. सध्या असलेले हिवताप अधिकारी कार्यालयात न जाता घरातूनच कार्यालयाचे कामकाज चालवत आहेत. कार्यालय काही मोजक्या कर्मचार्यांच्या भरवशावर चालू आहे. या विभागासाठी असलेले शासकीय चारचाकी वाहन, शासकीय इंधन घालून वैयक्तिक कारणांसाठी कोकण, पुणे, कराडपर्यंत उपयोगात आणले जात आहे. अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. संबंधित अधिकार्यांनी हे अपप्रकार लवकरात लवकर थांबवावेत.’’