परीक्षा नसत्या तर काय ?

१. विद्यार्थ्यांवर अनेक परीक्षांचा भडीमार वर्षभर चालू असणे

‘नुसता विचारही किती सुखावह आहे. परीक्षा नसत्या तर ? शालेय जीवनात विद्यार्थी कित्येक परीक्षांना सामोरे जात असतो. चाचणी, सहामाही, वार्षिक परीक्षा या नेहमीच्या झाल्याच; पण त्याच समवेत तोंडी, पाठांतर, विज्ञान प्रयोग, हस्तव्यवसाय, चित्रकला, पि.टी. (शारीरिक प्रशिक्षण) एक ना दोन अशा अनेक परीक्षांचा भडीमार वर्षभर चालू असतो.

प्रतिकात्मक छायाचित्र

 

२. परीक्षेच्या काळात दूरदर्शन बघणे आणि खेळ खेळणे बंद होणे

परीक्षांचे वेळापत्रक घोषित झाले आणि जसजसे परीक्षांचे दिवस जवळ यायला लागतात, तसतसे सारे वातावरणच पालटून जाते. विशेषतः वार्षिक परीक्षा ! घरातील दूरदर्शन बघणे तसे अशक्यच असते. या काळात तर दूरदर्शनचा आवाजही ऐकू येत नाही. खेळाची मैदाने ओस पडलेली असतात.

३. परीक्षा बंद झाल्याने होणारे दुष्परिणाम

अशा या परीक्षाच बंद झाल्या, तर किती मजा येईल ! सगळीकडे आनंदी आनंद पसरेल; पण परीक्षा झाल्या नाही आणि सगळेच उत्तीर्ण झाले, तर खर्‍या गुणवत्तेचा कस कसा लागणार ? शाळा-महाविद्यालयांमधून बाहेर पडल्यावर जेव्हा आपण आयुष्यातील खर्‍या परीक्षेला सामोरे जाऊ, तेव्हा आपले हात-पाय थरथरायला लागतील; कारण त्या वेळेस परीक्षांना सामोरे जायला आपण सिद्ध नसू. परीक्षा नसेल, तर आपण मिळवलेले माहितीजन्य ज्ञान आणि त्याचा आपल्याला समजलेला अर्थ हा चुकीचा कि बरोबर, हे कसे समजणार ?

४. परीक्षाच झाल्या नाहीत, तर भारत देशाची प्रगती कशी होणार ?

देशाला ‘विकसनशील’ देशापासून ‘विकसित’ देश अशी ओळख करून घ्यायला खर्‍या गुणवंतांची आवश्यकता आहे. अशा लोकांची, जे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील आणि भारत देशाचे नाव जगाच्या नकाशावर ठळक करतील. परीक्षाच झाल्या नाहीत, तर कदाचित् खरी गुणवत्ता झाकोळली जाईल. नाकर्त्या लोकांची नोकर्‍यांमध्ये भरती झाली, तर त्या आस्थापनाची स्थिती खालावेलच; पण अप्रत्यक्षपणे भारत देशाची सुद्धा प्रगतीच्या मार्गावरील घोडदौडीची गतीही मंद होईल.

५. परीक्षाच नसेल, तर ज्ञानार्थी कसे होणार ?

परीक्षाच नसेल म्हटले, तर शिक्षणाचे अंतिम ध्येयच नसेल, तर मग कोण कशाला शिकेल ? आणि कशाला कोण ज्ञानार्थी होईल ?

६. परीक्षेमुळे मनुष्याला संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळणे

परीक्षा असायलाच हव्यात. परीक्षा व्यक्तीला त्याची विद्या आणि बुद्धी अधिक तल्लख करायला भाग पाडतात. परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान मिळवण्यासाठी आणि मिळवलेले ज्ञान पुनःपुन्हा पडताळून पहाण्यासाठी भाग पाडतात. परीक्षा मनुष्याला आयुष्यात येणार्‍या संकटांना सामोरे जाण्याचे बळ देतात.

त्यामुळे ‘परीक्षा नसत्या तर ?’, हा विचार सुखावह असला, तरी त्याचे परिणाम भावी आयुष्यात नक्कीच सुखावह नसतील.’

(साभार : मासिक ‘श्रीमत् पूर्णानंदाय नमः’, दिवाळी विशेषांक २०१३)