दळणवळण बंदीनंतरची विदर्भातील हरू (जिल्हा यवतमाळ) येथील पहिली ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा !
यवतमाळ, १२ मार्च (वार्ता.) – हिंदु संस्कृती महान आहे, विश्वव्यापी आणि कल्याणकारी आहे. अखिल मानवजातीसह प्रत्येक प्राणीमात्रांचा विचार करणारी आहे. पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धती होती. त्यामध्ये १४ विद्या आणि ६४ कला शिकवल्या जात होत्या. आध्यात्मिक आणि व्यावहारिक शिक्षणासमवेत नैतिक मूल्यांचे शिक्षण दिल्यामुळे समाजव्यवस्था उत्तम असायची; परंतु धूर्त इंग्रजांनी गुरुकुल शिक्षणपद्धती बंद करून मेकॉलेप्रणीत इंग्रजी शिक्षणपद्धती चालू केल्यामुळे नैतिक मूल्यांचा र्हास झाला. व्यक्ती धर्माचरण करत नसल्याने संस्कृतीपासून दूर गेली. सध्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. मुली-महिला यांच्यावर अत्याचार वाढले आहेत. पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणामुळे आणि स्वार्थी वृत्तीमुळे व्यक्ती भोगवादी अशा भौतिक सुखाकडे वळली आहे. परिणामी बहुतेक जण दुःखी आहेत. त्यामुळे चिरंतन आनंद मिळण्यासाठी पाश्चिमात्यांचे अंधानुकरण सोडून धर्माचरण करत हिंदु संस्कृतीचे रक्षण करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. मंगेश खांदेल यांनी केले. ते ६ मार्च या दिवशी दारव्हा तालुक्यातील हरू येथील संत फकीरजी महाराज मंदिराच्या परिसरात झालेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत बोलत होते.
या वेळी त्यांनी महिला, तसेच मुली यांच्यावर होत असलेली आक्रमणे रोखण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. स्वरक्षण प्रशिक्षणसेवक श्री. अनिकेत अर्धापूरकर आणि गावात चालू असलेल्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील मुली यांनी या वेळी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखवली.
या सभेचा लाभ पुष्कळ ग्रामस्थांनी घेतला. या वेळी ह.भ.प. विष्णुपंत सरतापे महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. सभेसाठी सरपंच सौ. मयुरीताई सरतापे, उपसरपंच सौ. आशाताई सोनोने, तसेच गावकरी मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सभेसाठी सौ. उषा सावदे यांनी पुढाकार घेतला.