मुंबई – मुंबईतील ५०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा अल्प चटईक्षेत्र असणार्या निवासी मालमत्तांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याचे विधेयक विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले.
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हे मांडलेले होते. त्यामुळे १६ लाखांहून अधिक मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाणार असून मुंबईकरांना १ जानेवारी २०२२ या वर्षापासून करमाफीचा लाभ मिळणार आहे. पालिकेला दरवर्षी ५ सहस्र कोटी रुपये उत्पन्न मालमत्ता कराच्या वसुलीतून मिळते. या करमाफीमुळे महापालिकेच्या मालमत्ता कराच्या उत्पन्नात ४०० कोटी रुपयांची घट होणार आहे.
शिवसेनेने २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे वाचननाम्यात आश्वासन दिले होते; मात्र गेल्या पाच वर्षांत ही करमाफी प्रत्यक्षात लागू होऊ शकली नव्हती.