रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती सुनंदा सामंत (वय ८४ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

त्यागी वृत्तीच्या आणि जीवनातील कठीण प्रसंगांना हसतमुखाने सामोरे जाणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती सुनंदा सामंत (वय ८४ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती सुनंदा सामंत यांना भेटवस्तू देऊन सत्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

रामनाथी, गोवा – जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना हसतमुखाने सामोरे जाणार्‍या, सर्वांना प्रेम आणि आनंद देणार्‍या, तसेच आयुष्यभर इतरांच्या आनंदासाठी त्यागमय जीवन जगणार्‍या मूळच्या डिचोली येथील आणि आता सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणार्‍या श्रीमती सुनंदा सामंत (वय ८४ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता एका सत्संगात घोषित करण्यात आली. १६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सामंत कुटुंब आणि काही साधक यांच्याशी साधनेविषयी अनौपचारिक चर्चा करत असतांना ही आनंदवार्ता सर्वांना दिली. श्रीमती सामंतआजी यांच्या कुटुंबियांसह त्यांची सेवा करणारे साधक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पहात होते, तो क्षण अनुभवण्यास मिळाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. या वेळी श्रीमती सामंतआजींची ज्येष्ठ कन्या आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी दुर्गेश सामंत, आजींचे जावई आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, आजींचा मुलगा श्री. अनिल सामंत, सून सौ. अदिती सामंत आदी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर आजींचा नातू श्री. मुकुल दुर्गेश सामंत (आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांचा मुलगा) भ्रमणभाषद्वारे जोडलेला होता.


श्रीमती सामंतआजी यांची आंतरिक साधना चांगली असून त्या स्वतःकडे साक्षीभावाने बघतात !

श्रीमती सुनंदा सामंत यांच्या साधनेविषयी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

काही दिवसांपूर्वी मी श्रीमती सामंतआजींना लांबून पाहिले, तरी त्यांच्याकडे बघत रहावेसे वाटले. ‘त्यांची आंतरिक साधना चांगली चालू आहे, तसेच त्या स्वतःकडे साक्षीभावाने बघत आहेत. त्या सतत देवाच्या अनुसंधानात असून त्यांना स्वतःच्या कौतुकाची अपेक्षा नाही. त्यांच्यात एक वेगळ्याच प्रकारची स्थिरता जाणवते. मी त्यांना पहिल्यांदा पाहिले असतांनाही ‘त्या आणि मी आधीपासून जोडलेलो आहोत’, असेच जाणवले. गुरूंप्रतीचा अपार भाव, नम्रता, अल्प अहं यांमुळे आता त्यांची पुढची प्रगती जलद गतीने होणार आहे. आपण सर्वांनी आजींकडून शिकूया आणि त्यांचे गुण आचरणात आणूया.


श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती सामंत यांची आध्यात्मिक पातळी घोषित करतांना म्हटलेल्या काव्यपंक्ती

‘ऐका साधकहो, ८४ या आकड्याचे गमक ।
आकडा हा ८४, दर्शवतो ८४ लक्ष योनी ।
आकडा हा ८४, दर्शवतो ८४ लक्ष योनी फिरून आलेला मनुष्यजन्म ।
आकडा हा ८४, दर्शवतो सामंतआजी यांच्या वयाची ८४ वर्षे ।
हाच आकडा ८४, आता सांगतो, पुन्हा मनुष्यजन्म मिळण्या नको ८४ लक्ष योनींचे फेरे ।
कारण आज सामंतआजी वयाच्या ८४ व्या वर्षी होती ८४ लक्ष योनींच्या फेर्‍यांतूनी मुक्त ।।’

मध्यभागी आसंदीत बसलेल्या श्रीमती सुनंदा सामंत, त्यांच्या पाठीमागे डावीकडून आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, सौ. अदिती सामंत आणि श्री. अनिल सामंत

अशी झाली आनंदवार्तेची घोषणा !

सामंत कुटुंबीय आणि काही साधक यांच्यासाठी आयोजित केलेल्या सत्संगामध्ये प्रारंभी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. वैष्णवी वेसणेकर यांनी भावार्चना घेतली. त्यामध्ये ‘साधकांच्या साधना प्रवासात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्यासाठी किती केले ?’, ‘आयुष्याच्या कठीण प्रसंगी आणि संकटाच्या प्रसंगी भगवंत अन् परात्पर गुरुदेव यांनी कसे साहाय्य केले ?’, याविषयीचे प्रसंग आठवून कृतज्ञताभाव अनुभवण्यास सांगितले. यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उपस्थित साधकांना ‘भावार्चनेमध्ये साधकांना काय अनुभवायला आले ?’, याविषयी सांगण्यास सांगितले. त्या वेळी उपस्थित साधकांपैकी काही जणांनी ‘आयुष्यातील कठीण प्रसंगांत परात्पर गुरुदेवांनी कसे सांभाळले ?’, ‘देवाने कशी अनुभूती देऊन कठीण प्रसंगातून तारून नेले’, याविषयी सांगितले. यानंतर श्रीमती सुनंदा सामंतआजी यांना त्यांच्या साधना प्रवासाविषयी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी विचारले. त्यावर त्या काही बोलू शकल्या नाहीत. या प्रसंगी श्रीमती सामंतआजी यांच्या ज्येष्ठ कन्या आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी ‘श्रीमती सामंतआजींनी आयुष्यातील कठीण प्रसंगांना कसे तोंड दिले ?’, ‘प्रत्येक प्रसंगात त्यागी वृत्तीने, प्रेमाने आणि स्थिर राहून देवाच्या साहाय्याने श्रीमती सामंतआजींनी कशी मात केली ?’, याविषयीचे काही प्रसंग सांगितले. त्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी एका काव्याद्वारे श्रीमती सुनंदा सामंतआजी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे घोषित केले. त्या वेळी श्रीमती सामंतआजींसह सर्वच साधकांना आनंद झाला.

या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती सामंतआजींचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.

मी काहीही विशेष प्रयत्न न करता परात्पर गुरुदेवांनी मला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले !

आध्यात्मिक पातळी घोषित केल्यानंतर श्रीमती सुनंदा सामंत यांनी व्यक्त केलेले मनोगत

माझे मोठे भाग्य आहे की, मी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले. माझ्या जन्माचे सार्थक झाले. ‘परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांनी आमच्यासाठी किती केले’, हे मी शब्दांत सांगू शकत नाही. ते आम्हा सर्व साधकांसाठी पुष्कळ काही करतात. मी काहीही विशेष प्रयत्न न करता त्यांनी (परात्पर गुरुदेवांनी) मला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले, हेच मोठे आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधनेविषयी केलेले अन्य मार्गदर्शन

१. नराचा नारायण करणारे सर्वसामर्थ्यशाली परात्पर गुरुदेव !

आपल्याला मिळालेला हा मनुष्यजन्म अत्यंत दुर्लभ आहे. ८४ लक्ष योनी फिरून आल्यानंतरच आपल्याला मनुष्यजन्माची प्राप्ती होते. अशा प्रकारे आपल्याला दुर्लभ मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे आणि त्यापेक्षाही दुर्लभ म्हणजे साक्षात् नारायणस्वरूप गुरुदेव, जे नराचा नारायण करणारे आहेत, त्यांचीही आपल्याला प्राप्ती झाली आहे. मग साधनेची ही दुर्लभ संधी आपण का सोडायची ? ‘८४ लक्ष योनींचे फेरे पार करून मिळालेल्या या नरदेहाचा उद्धार याच जन्मात व्हावा’, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. गुरुदेवांच्या संकल्पाने काळानुरूप सर्वांमध्ये जलद पालट होऊन साधकांची प्रगती होत आहे. गुरूंच्या संकल्पाला आपल्या प्रयत्नरूपी क्रियमाणाची जोड देऊन साधनेचे प्रयत्न कृतज्ञताभावाने आणि झोकून देऊन वाढवूया.

२. गुरूंच्या कृपाछत्राखाली असलेल्या प्रत्येक साधकाच्या अनुभूती म्हणजे एक एक गुरुगाथाच !

साधनेत आल्यापासून साधकांच्या साधनाप्रवासामध्ये गुरुदेवांच्या अपार कृपेच्या अनेक अनुभूती सनातनच्या प्रत्येक साधकाने घेतल्या आहेत. साधकांना आलेल्या अनुभूती एवढ्या आहेत की, प्रत्येक साधकाच्या अनुभूती म्हणजे एक एक गुरुगाथाच आहे. अनेकांनी परात्पर गुरुदेवांना प्रत्यक्ष पाहिलेले नाही; पण त्या सर्वांना त्यांच्याबद्दल अनेक अनुभूती आल्या आहेत. ‘साधक सनातनशी कसे जोडले जातात ?’, ‘अनेकांना आवड नसतांना ते साधनेकडे कसे ओढले जातात ?’, हे सर्व आपल्या अल्पबुद्धीच्या पलीकडचे आहे. परात्पर गुरुदेव कोट्यवधी लोकांमधून एक एक साधकाला जीवनमुक्त करत आहेत, ही सनातनच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. त्यामुळे गुरुदेवांप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

श्रीमती सुनंदा सामंत यांच्या कुटुंबियांनी त्यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

आईमध्ये त्यागी वृत्ती असून ती सतत इतरांचा विचार करते ! – आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, ज्येष्ठ कन्या

१. आईचा (श्रीमती सुनंदा सामंत यांचा) स्वभाव पहिल्यापासूनच त्यागी आहे. तिच्या लहानपणी कुटुंब मोठे होते आणि घरात गरिबी होती. आईच्या मोठ्या भावाला १० वीच्या परीक्षेसाठीचे शुल्क भरण्यासाठी पैसे अल्प पडत होते. त्या वेळी आईने तिच्या बाबांनी तिच्या शिक्षणासाठी दिलेले पैसे मोठ्या भावाला शुल्क भरण्यासाठी दिले. त्यानंतर तिने नोकरी करून १० वी पर्यंत शिक्षण घेतले. आईने शिक्षक म्हणून चाकरी केली आहे. आईचे लग्न झाल्यानंतर तिच्या सासरीही आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. असे असूनही आईने संसार करतांना अनेक वेळा इतरांचा विचार करून त्याग केला. तिच्यात प्रेमभाव आणि सहन करण्याची पुष्कळ क्षमता आहे.

२. मी आणि आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत आम्ही दोघे पूर्णवेळ झाल्यानंतर तिने चि. मुकुल याला वयाच्या ५ व्या वर्षापर्यंत सांभाळले. त्याच्या शिक्षणाविषयीही आईनेच सर्वकाही बघितले, तसेच त्याच्यावर चांगले संस्कारही केले.

३. आई दीड वर्षापूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प्रथमच रहायला आली. त्या वेळी तिच्यासाठी आश्रमजीवन नवीन होते. त्या वेळी आईचे वय ८३ असूनही तिने आश्रमजीवन स्वीकारले. मुलाला (श्री. अनिल सामंत) आणि सुनेला (सौ. अदिती सामंत) पूर्णवेळ साधना करता यावी, यासाठी ती आश्रमात रहाण्यास सिद्ध झाली.

४. आश्रमजीवन जगतांना प्रारंभी तिच्या मनावर ‘साधक साधना करतात आणि मी साधना करत नाही’, ‘मला आश्रमातील कार्यपद्धती पाळता येतील ना ?’, ‘मी खेड्यातून आले आहे’, अशा अनेक विचारांचे दडपण होते. कालांतराने तिच्या मनातील विचारांचे दडपण दूर झाले आणि ती आश्रमातील साधक अन् आश्रमजीवन यांमध्ये रुळली.

घरातील समस्यांना स्थिर राहून शांतपणे सामोरे जाणार्‍या श्रीमती सुनंदा सामंत ! – आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (श्रीमती सुनंदा सामंत यांचे जावई)

श्रीमती सामंतआजींचे वागणे अतिशय मर्यादाशील असते. मी घरी गेल्यावर त्या सर्वकाही व्यवस्थित आणि सहजतेने करतात. त्या घरातील अनेक समस्यांत स्थिर राहून आणि शांतपणे सामोरे जात असतात. एका प्रसंगात त्यांची ४ लाख रुपयांची हानी झाली, त्या वेळीही त्यांनी ते शांतपणे स्वीकारले आणि त्या स्थिर राहून म्हणाल्या, ‘‘ते पैसे जाणारच होते.’’

लहानपणापासून आजीने पुष्कळ प्रेम दिले ! – श्री. मुकुल सामंत (आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांचा मुलगा)

मी लहानपणापासून आजीकडे राहिलो आहे. तिने लहानपणापासून माझ्यासह सर्वांवर पुष्कळ प्रेम केले. मी तिचे सर्वाधिक प्रेम अनुभवले आहे. आजीने कायम सर्वांना साहाय्य केले; पण कधी कुणाविषयी तक्रार केली नाही. तिने आयुष्यात अनेक प्रसंगांत त्याग केल्याचे मी बघितले आणि अनुभवले आहे. आजच्या सत्संगात तिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे कळल्याने देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. आजचा सत्संग लाभल्याने मला आनंद झाला आणि माझी मनःस्थितीच पालटली.