मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – पोलीस अंमलदाराच्या स्थानांतराविषयी पाठवलेल्या पत्रामध्ये महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख करतांना पुण्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी महिलेच्या पदनामाचा उल्लेख केला. यामुळे महिलेची अपकीर्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी देशमुख यांना निलंबित करण्याची मागणी केली. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी ही टंकलेखनाची चूक असल्याचे सांगितल्यावर विरोधकांनी आक्रमक होऊन सभापतींच्या आसनाच्या समोरील जागेत जमून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
या वेळी विरोधकांनी अभिनव देशमुख यांना निलंबित करण्याची मागणी करणारे फलक हातात धरून घोषणा दिल्या. या गोंधळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले. त्यानंतरही विरोधकांनी अभिनव देशमुख यांच्या निलंबनाची मागणी केली. यावर सभापतींनी गृहराज्य मंत्र्यांसमवेत विरोधकांनी बैठक घेऊन निर्णय घेण्यास सांगितले.