महापालिकेच्या आयुक्तांवर शाई फेकल्याचे प्रकरण
अमरावती – येथील महापालिकेच्या आयुक्तांवर शाई फेकल्याच्या प्रकरणी ५ मार्च या दिवशी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आमदार रवि राणा यांना सशर्त जामीन संमत केला आहे. शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्यानंतर त्याच दिवशी महानगरपालिका प्रशासनाने तो पुतळा हटवला होता. त्यानंतर ९ फेब्रुवारी या दिवशी महापालिकेच्या आयुक्तांवर ‘युवा स्वाभिमान पक्षा’च्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली होती. त्याच दिवशी रात्री विलंबाने महापालिका आयुक्तांच्या तक्रारीवरून आमदार रवि राणा यांच्यासह ११ जणांविरुद्ध ३०७ कलमान्वये गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर राणा यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज प्रविष्ट केला होता. आमदार रवि राणा यांनीच कारस्थान रचल्याचा आरोप करून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद केला होता.