भारताने रशियाला युद्ध थांबवायला सांगावे ! – युक्रेनची पंतप्रधान मोदी यांना विनंती

उजवीकडे युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा

कीव (युक्रेन) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना ‘युद्ध कोणत्याही देशाच्या हिताचे नाही’, असे समजावून सांगा, अशी मागणी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ५ मार्च या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. ‘मोदी यांनी पुतिन यांच्याशी चर्चा करून त्यांना युक्रेनविरोधातील युद्ध थांबवण्यास सांगावे’, असे आवाहनही त्यांनी केले. ‘युक्रेन हा भारताच्या अन्न सुरक्षेसाठी महत्त्वाचा देश आहे, त्यामुळे हे युद्ध थांबवणे भारताच्या हिताचे आहे’, असेही ते मोदी यांना म्हणाले.

कुलेबा पुढे म्हणाले की,

१. भारताशी विशेष संबंध असलेले सर्व देशही पुतिन यांना आवाहन करू शकतात. आपण हे लक्षात घ्यायला हवे की, भारत हा युक्रेनियन कृषी उत्पादनांचा सर्वांत मोठा ग्राहक आहे आणि हे युद्ध असेच चालू राहिल्यास आम्हाला नवीन पीक पेरणी आणि उत्पादन घेणे कठीण होईल. त्यामुळे जागतिक अन्न सुरक्षा आणि भारतीय अन्न सुरक्षेच्या दृष्टीने हे युद्ध थांबवणे महत्वाचे आहे.

२. सामान्य भारतीय नागरिक भारतातील रशियन दूतावासावर दबाव आणू शकतात आणि त्यांच्याकडे युद्ध थांबवण्याची मागणी करू शकतात. युक्रेनला या युद्धाची आवश्यकता नाही.

३. युक्रेनच्या खारकीव आणि सुमी येथून परदेशी विद्यार्थ्यांना माघारी पाठवण्यासाठी आम्ही काही गाड्यांची व्यवस्था केली आहे, तसेच आम्ही परदेशी विद्यार्थ्यांसाठी एक हॉटलाइन (संपर्क यंत्रणा) सिद्ध केली आहे. आम्ही संबंधित दूतावासांशी समन्वय साधून काम करत आहोत.