सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
एखाद्या झाडापासून नवीन रोप सिद्ध करण्यासाठी त्या झाडाचा कोणता भाग उपयोगी आहे, हे माहिती असणे आवश्यक आहे. काही झाडे फांद्यांपासून, काही बीपासून, काही मुळांपासून, तर काही पानांपासून करता येतात. झाडाचा प्रत्येक भाग कसा वापरायचा, हे ठाऊक झाले की, आपण दुसरे झाड घरच्या घरी करू शकतो. त्यासाठी नर्सरीत (रोपवाटिकेत) जाण्याची आवश्यकता पडत नाही. तसेच एखादे झाड काही कारणामुळे मरणार, असे वाटले, तर लगेचच ते जिवंत असतांनाच आपण त्यापासून दुसरे झाड सिद्ध करू शकतो.
१. फांदीपासून सिद्ध होणारी नवीन रोपे
अ. ज्या झाडांची नवीन रोपे फांद्यांपासून सिद्ध होतात, अशा झाडांच्या
फांद्या कापल्यानंतर त्या आपण नवीन रोप सिद्ध करण्यासाठी वापरू शकतो. यासाठी अगदी कोवळी किंवा पुष्कळ जून फांदी वापरू नये. त्यामु
ळे सर्वसाधारणपणे कापलेल्या फांदीचा मधला भाग घ्यावा.
आ. फांदी साधारणपणे ६ ते ८ इंच लांबीची असावी. ६ ते ८ इंच लांबीच्या फांदीला ४ ते ५ पेरे (पेर म्हणजे पान फांदीला जिथे चिकटलेले असते तो बिंदू) अपेक्षित आहेत. पेराजवळ डोळा असतो. ज्यातून नवीन फांदी फुटते म्हणजेच सिद्ध होते. तसेच पेराजवळूनच फांदीला मुळेही फुटतात.
इ. नवीन झाड सिद्ध करण्यासाठी फांदी मातीत लावावी, म्हणजेच ती मातीत उभी खोचावी. मातीत गेलेल्या पेरांना मुळे फुटतील आणि वरील पेरांमधून नवीन पाने येतील. यासाठी किमान २-३ पेरे मातीत जातील, असे पहावे.
ई. फांदी मातीत लावतांना मातीत जाणार्या पेरांजवळची पाने कापावीत. फांदी मातीत थेट न खोचता प्रथम लोखंडी सळई किंवा एखादी काठी मातीत खुपसून फांदी लावण्याची जागा मोकळी करावी आणि सळई मातीतून
काढून त्या जागी फांदी लावावी. फांदी मातीत थेट खुपसली, तर फांदीच्या खालच्या पेरांना ईजा पोचते.
१ अ. फांदीपासून येणारी काही फुलझाडे : तगर, अनंत, बोगनवेल, जास्वंद, एक्झोरा, मोगरा, गुलाब, रातराणी, सर्व रंगाचे क्रोटन (शोभेचे झाड).
२. बीपासून होणारी नवीन रोपे
बी लावतांना ती मातीत किती खोल लावायची, हे ठाऊक नसल्यामुळे बर्याच वेळा लावलेल्या बियांमधून काही उगवत नाही. प्रत्येक बीचा आकार आणि आकारमान वेगळे असते. तुळशीचे बी अगदी बारीक असते, तर वाटाणा आणि वाल यांच्या बीचा आकार चांगलाच मोठा असतो. बी लावतांना त्यावर जी माती असेल, त्या मातीच्या थराची जाडी बीच्या जाडीच्या जास्तीत जास्त तिप्पट असावी. त्यापेक्षा अधिक नको. याचाच अर्थ तुळशीचे बी किंवा मिरची, टोमॅटो इत्यादींच्या बीवर माती अगदी थोडीशीच घालावी, तर वाटाण्यावर १ सें.मी. जाडीचा मातीचा थर चालेल. मातीचा थर अधिक झाला आणि तो थर फोडून जर बी वर येऊ शकत नसेल, तर बी उगवणार नाही. त्यामुळे साधारणपणे बीच्या आकाराच्या दुपटी एवढाच मातीचा थर त्यावर असावा.
२ अ. बीपासून येणारी काही झाडे : गोकर्ण, अबोली, झेंडू, सदाफुली, तुळस, गुलबक्षी, तेरडा, सूर्यफूल, मखमली कोंबडा.
३. कंद-मुळांपासून नवीन रोपे
सोनटक्का, कर्दळ, लिली इत्यादींची नवीन रोपे त्यांच्या कंदांपासून करता येतात. एका कंदाला झाड येऊन फुले आल्यानंतर त्याची वाढ होते आणि नवीन रोप त्याला फुटते. हे नवीन रोप दुसरीकडे लावायचे असल्यास जुन्या झाडाची फुले फुलून गेल्यानंतर लोखंडी सळी आणि पट्टीच्या साहाय्याने तो कंद मातीतून मोकळा करावा आणि नवीन रोपाच्या पानांखाली असलेल्या कंदासह तो जुन्या कंदापासून हाताने मोडून मोकळा करावा. तो कापू नये. कंद मोडून मोकळा केल्याने झाडाच्या दृष्टीने तो योग्य ठिकाणीच तुटतो. हा कंद मातीत लावतांना पूर्णपणे मातीने झाकला जाईल, इतका खोल खड्डा करून त्यात ठेवावा आणि मातीने पूर्णपणे झाकावा. नवीन फुटलेले रोप सगळ्या पानांसह जमिनीच्या वर असावे.
३ अ. कंदापासून येणारी काही झाडे : सोनटक्का, कर्दळ, लिली, रजनीगंधा, भाजीचे अळू, आले, वेखंड, हेलिकोनिया.
४. पानांपासून येणारी नवीन रोपे
नवीन रोपांसाठी काही झाडांची पाने जमिनीत लावावी लागतात. सर्वसाधारणपणे या झाडांच्या पानांच्या कडेला असणार्या खाचांमधून नवीन फूट येते आणि मुळेही फुटतात. पानांची जाडी अगदीच अल्प असल्यामुळे पाने लावतांना पान जमिनीवर आडवे ठेवावे. त्यावर पानांच्या खाचा झाकल्या जातील, अशा रितीने मातीचा पातळ थर द्यावा. त्यावर पाणी घालतांना माती धुऊन जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
४ अ. पानांपासून येणारी काही झाडे : ब्रह्मकमळ, पानफुटी.
– डॉ. नंदिनी बोंडाळे, ठाणे
(साभार : दैनिक ‘लोकमत’)