रशिया ३ अटींवर युक्रेनशी चर्चा करण्यास सिद्ध !

मॉस्को (रशिया) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ३ अटी ठेवत युक्रेनसमवेत चर्चा करण्यास सिद्ध आहे, असे म्हटले आहे. पुतिन यांनी हे वक्तव्य जर्मन चान्सलर ओलाफ सोल्ज यांच्याशी संभाषणाच्या वेळी केले आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय ‘क्रेमलिन’ यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

१. पुतिन यांनी ‘युक्रेन हा तटस्थ आणि गैर-अणूऊर्जा देश असेल’, ‘क्रिमिया हा रशियाचाच भाग आहे, हे युक्रेनने मान्य करावे’ आणि ‘पूर्व युक्रेनच्या बंडखोर भागांचे स्वातंत्र्य मान्य केले जावे’, अशा ३ अटी ठेवल्या आहेत.

२. दोन्ही देशांतील चर्चेच्या तिसर्‍या फेरीत सकारात्मक चर्चेची आशा व्यक्त करण्यात आली आहे. दोन्ही देशांत चर्चेची पुढील फेरी पुढील आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या दोन फेर्‍या झाल्या असूून त्यातून कोणतेही ठोस मार्ग निघू शकलेला नाही.