पू. (कु.) दीपाली मतकर यांनी स्वतःचा संतसन्मान सोहळा होण्यापूर्वी आणि संतसन्मान सोहळ्याच्या वेळी अनुभवलेली भावस्थिती !

२८.१०.२०२१ या दिवशी सोलापूर येथे कु. दीपाली मतकर यांनी संतपद गाठल्याचे सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी एका कार्यक्रमात घोषित केले. ‘त्या सोहळ्याचे नियोजन करतांना पू. (कु.) दीपाली यांनी काय अनुभवले आणि त्यांची भावस्थिती’ यांविषयी पुढे त्यांच्याच शब्दांत दिले आहे.

‘पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी पू. (कु.) दीपाली मतकर आणि सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांना बर्‍याच अनुभूती एकसारख्या आल्या. आतापर्यंत अशा अनुभूती कोणालाच आलेल्या नाहीत. या अनुभूतींबद्दल दोघींचे कौतुक करावे तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.२.२०२२)
पू. (कु.) दीपाली मतकर

१. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी सोहळ्यासाठी आवश्यक त्या सर्व सेवांचा समन्वय करणे

‘सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी सोलापूर येथे येण्याआधी मला सांगितले, ‘‘मी पुष्कळ दिवसांनी सोलापूर दौर्‍यासाठी येणार आहे. त्यामुळे प्रारंभी काही साधकांसाठी सभागृहात मार्गदर्शन ठेवूया. त्यासाठी सभागृह पहा.’’ त्यानुसार आम्ही (मी आणि श्री. हिरालाल तिवारी यांनी) सभागृह पहाण्यास प्रारंभ केला. आम्हाला सहजतेने सभागृह उपलब्ध झाले. ‘सभागृहातील स्वच्छता आणि सिद्धता’, अशा सर्व सेवांचे नियोजन माझ्याकडेच होते. मी साधकांना त्या सर्व सेवांचे नियोजन करून दिले आणि आदल्या दिवशी सर्व साधकांच्या समवेत सभागृहातील सिद्धता केली. सोहळ्याच्या आदल्या दिवशी सद्गुरु स्वातीताई मला म्हणाल्या, ‘‘तू मला तुझ्या साड्या दाखव. ‘तू उद्या कोणती साडी नेसायचीस ?’, हे मी तुला सांगते.’’ त्यानंतर मी त्यांना माझ्याकडील सर्व साड्या दाखवल्या; पण त्यांनी मला सांगितले, ‘‘यांतील कोणतीच साडी उद्या चालणार नाही.’’ सद्गुरु ताईंनी अकलूज येथून पू. (सौ.) संगीता जाधव यांची साडी मागवली आणि ती मला नेसायला सांगितली. मला काहीच कळू न देता सद्गुरु स्वातीताई चित्रीकरणाच्या संदर्भातील समन्वय आणि सोहळ्यासाठी आवश्यक त्या सर्व सेवांचा समन्वय एकट्याच करत होत्या.

२. संतसन्मान सोहळ्याची पूर्वसिद्धता चालू असतांना अनुभवलेले दिव्य वातावरण

२ अ. सोहळ्याची सिद्धता चालू असतांना ‘सेवाकेंद्रात दिव्य लोक अवतरला आहे’, असे जाणवणे आणि प्रत्येक साधकाला भेटल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाच भेटल्याचा आनंद जाणवून मन कृतज्ञतेने भरून येणे : सोहळ्याची सिद्धता चालू असतांना सेवाकेंद्रात सर्व जण ‘दिव्य लोक अवतरला आहे’, असे अनुभवत होते. सेवाकेंद्रातील साधकांकडे पाहिल्यावर ‘सर्व जण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रीतीच्या धारांत भिजत आहेत’, असे मला वाटत होते. सर्व जण पुष्कळ आनंदी होते. त्यामुळे ‘सेवाकेंद्र जणू आनंदाने डोलत आहे’, असे मला वाटत होते. साधकांच्या मुखावरील आनंद पाहून ‘साधकांना ठाऊक असलेले गुपित ते माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे मला वाटले. ते जे लपवत होते, ते त्यांचे बोलणे आणि कृती यांतून मला जाणवत होते; पण ते गूढ भगवंतालाच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाच) उलगडायचे होते. प्रत्येक साधकाला भेटल्यावर मला परम कृपाळू परात्पर गुरुदेवच भेटल्याचा आनंद होत होता. हे पाहून माझे मन कृतज्ञतेने भरून येत होते.

२ आ. साधिकांच्या समवेत रांगोळी काढतांना ‘परात्पर गुरुमाऊली भेटण्यासाठी येणार आहे’, असे वाटून मन कृतज्ञतेने भरून येणे : सोहळ्याच्या दिवशी साधिका सभागृहात ‘श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करणे आणि प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढणे’, अशा सेवा करत होत्या. त्यांच्या समवेत रांगोळी काढण्याची सेवा करतांना ‘परमप्रिय कृपाळू परात्पर गुरुमाऊली मला आज भेटण्यासाठी येणार आहे, तर त्यांच्या स्वागताची कशी सिद्धता करू ?’, असे मला वाटत होते.

२ इ. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये वैयक्तिक सिद्धता करण्यात साहाय्य करत असतांना ‘हे भगवंताचेच प्रेम आहे’, असे वाटून भाव जागृत होणे : माझे वैयक्तिक आवरतांना सद्गुरु स्वातीताई आणि केतकीताई (सौ. केतकी साने) माझा अंबाडा घालून देत होत्या. सद्गुरु ताई स्वतःच माझी सिद्धता करून देत होत्या. ‘माझ्या कानात कानातले घालणे आणि गळ्यात माळ घालणे’, असे त्या स्वतः करत होत्या. भगवंताचे हे प्रेम पाहून मला काहीच कळत नव्हते. ‘भगवंताने किती ही प्रीती करावी !’, असे वाटून माझा भाव जागृत होत होता. त्या वेळी ‘मी कोणत्या तरी दिव्य लोकात आहे’, असेच मला जाणवत होते.

२ ई. ‘दोन साधकांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार आहे आणि स्वतःचे साधनाप्रवास सांगतांना चित्रीकरण करायचे आहे’, असे सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी सांगणे : सोहळ्याच्या पूर्वी सद्गुरु स्वातीताईंनी सांगितले, ‘‘एका दूरचित्रवाहिनीसाठी माझे साधनेविषयी चित्रीकरण करायचे आहे. त्यामुळे चित्रीकरणासारखी रचना (‘सेटअप’) केली आहे. श्री. राजन बुणगे आणि सौ. सुनंदा म्हात्रे या दोन साधकांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्याचेही नियोजन केले आहे.’’

 ३. भावपूर्ण वातावरणात उलगडले संतपद गाठल्याचे गुपित

३ अ. साधकांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर सद्गुरु स्वातीताईंनी मला सांगितले, ‘‘आता तू तुझा साधनाप्रवास सांगतांना चित्रीकरण करायचे आहे. मी तुला प्रश्न विचारीन. त्याची तू सहजतेने उत्तरे दे.’’ 

३ आ. व्यासपिठावर सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या समवेत बसल्यावर ‘देवीच्या समोरच बसले आहे  आणि परात्पर गुरुदेवांच्या प्रीतीचे वर्णन तिला करत आहे अन् ही गुरूंची कृपा ऐकण्यासाठी सूक्ष्मातून देवता आल्या आहेत’, असे जाणवणे : मी व्यासपिठावर सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत बसल्यावर ‘मी देवीच्या समोर बसले आहे आणि ‘परात्पर गुरुदेवांचे माझ्यावर कसे प्रेम आहे, हे मी त्या मातेला सांगत आहे’, असे मला वाटले. सद्गुरु स्वातीताईंच्या तोंडवळ्यावरील आनंद आणि कुतूहल पाहून ‘श्री गुरु कृपा कशी करतात ?’, हे जाणून घेण्यासाठी ती माताही व्याकुळ झाली आहे’, असे मला जाणवत होते. ‘ही सर्व गुरूंची कृपा पहाण्यासाठी सूक्ष्मातून देवताही आल्या आहेत आणि काळ थांबला आहे’, असे मला जाणवत होते.

३ इ. वार्तालापाच्या वेळी केवळ गुरुकृपा आणि प्रीतीस्वरूप परात्पर गुरुदेवांची प्रीती अनुभवणे : वार्तालापाच्या वेळी सद्गुरु स्वातीताई मला माझ्या आतापर्यंतच्या जीवनात घडलेल्या लहानपणापासूनच्या निरनिराळ्या प्रसंगांविषयी सहजतेने आणि प्रेमाने प्रश्न विचारत होत्या. मी ते क्षण अनुभवत होते. मला त्यात केवळ परम कृपाळू परात्पर गुरुमाऊलींची कृपाच अनुभवता येत होती. ‘त्या काळात मला किती कष्ट झाले ? किती प्रसंगांत मनाला दुःख झाले !’, असे काहीच न जाणवता ‘केवळ गुरुकृपा आणि प्रीतीस्वरूप परात्पर गुरुदेवांची प्रीतीच माझ्यावर कशी होती ! त्यांनी माझ्यावर कशी दिव्य कृपा केली ! मला सहजतेने कसे घडवले !’, हेच मी सांगत होते.

३ ई. संतसन्मान सोहळ्यात सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी गळ्यात हार घातल्यानंतर ‘मीपणा’ हरल्याचे जाणवून भाव जागृत होणे : वर्ष २०१२ मध्ये एकदा मी गुरुदेवांच्या खोलीत सेवेला गेल्यावर ते मला म्हणाले होते, ‘‘तुझा श्रीकृष्णाशी विवाह झाल्यावर मी तुला तुळशीचाच हार घालून पाठवणार. अन्य आई-वडिलांप्रमाणे तुला अलंकार देणार नाही.’’ ‘तेव्हापासून तो क्षण कधी येईल ? अन् भगवंत मला तो आनंद कधी देईल ?’, याची मी आतुरतेने वाट पहात होते. सद्गुरु स्वातीताईंनी संतसन्मान सोहळ्यात माझ्या गळ्यात हार घातल्यानंतर ‘तोच हा हार असून भगवंताने मला वरल्याचे अन् माझ्यातील ‘मीपणा’ हरल्याचे मला जाणवले. त्या वेळी माझा भाव जागृत होत होता.

३ उ. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी हृदयाशी कवटाळल्यावर ‘कृपाळू गुरुमाऊलीनेच त्यांच्या हृदयात मला स्थान दिले’, असे जाणवणे : सन्मान झाल्यानंतर सद्गुरु स्वातीताईंनी मला हृदयाशी कवटाळल्यावर ‘कृपाळू गुरुमाऊलीनेच मला त्यांच्या हृदयात स्थान दिले. ‘आता माझे काही नाही राहिले । केवळ तुझ्या पायी सर्व हरले ।’, असे वाटून मी सद्गुरु ताईंच्या मंगलदायी चरणांना नमस्कार केला.

४. साधकांनी निरनिराळ्या प्रसंगांतून शिकवल्याने साधकांना मानस नमस्कार करतांना त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे

छायाचित्र काढणारे साधक माझी छायाचित्रे काढत असल्यामुळे मला साधकांना व्यासपिठावरून खाली जाऊन भेटता येत नव्हते. त्यामुळे मी त्यांना सूक्ष्मातून वंदन करून आणि त्यांना सूक्ष्मातून भेटून कृतज्ञता व्यक्त करत होते. सर्व साधकांना मानस नमस्कार करतांना ‘या सर्व साधकांनीच माझी श्रीहरीशी भेट घडवून आणली. त्यांनीच मला निरनिराळ्या प्रसंगांतून शिकवले आणि घडवले’, असे वाटून मला त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

५. वेळेचे भान न रहाणे

मी सोहळा झाल्यानंतर सभागृहातून बाहेर आले. तेव्हा मला वाटले, ‘आम्ही दुपारी तीन वाजता सोहळ्यासाठी गेलो होतो. आता सायंकाळचे सात वाजले असतील.’ प्रत्यक्षात तेव्हा रात्रीचे १०.३० वाजले होते.

‘परम कृपाळू गुरुमाऊली, तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी किती करता ! गुरुमाऊली, आम्हाला सर्व तुमच्यासम करता येऊ दे. आम्हाला केवळ तुमचेच अस्तित्व अनुभवता येऊन तुम्हाला अपेक्षित अशी सेवा आमच्याकडून होऊ दे’, अशी सर्व समष्टीरूपाची आपल्या पावन चरणी प्रार्थना आहे.’

– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर (२४.१.२०२२)


पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

२८.१०.२०२१ या दिवशी सोलापूर येथे कु. दीपाली मतकर यांनी संतपद गाठल्याचे सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी एका कार्यक्रमात घोषित केले. त्या वेळी सद्गुरु सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी अनुभवलेले दैवी क्षण येथे दिले आहेत.

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

१. पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या पूर्वी ‘त्यांना समजू न देता सर्व सिद्धता करणे’, ही परीक्षाच असणे, त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण होऊन सूत्रे सुचणे

‘पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी त्यांच्याशी वार्तालाप साधून (त्यांची मुलाखत घेऊन) त्यांचा लहानपणापासून ते संतपदापर्यंतचा साधनाप्रवास वार्तालापाच्या माध्यमातून मला सर्वांसमोर उलगडायचा होता आणि तेव्हा त्यांनी संतपद प्राप्त केल्याचे गुपित मला सर्वांना सांगायचे होते. त्या वेळी मला त्यांना काही जाणवूही द्यायचे नव्हते. हे माझ्यासाठी पुष्कळ अवघड होते. कु. दीपाली सतत माझ्या समवेत असायच्या. ‘त्यांना समजू न देता सर्व सिद्धता करणे’, ही माझी परीक्षाच होती. ही सिद्धता करतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून साहाय्य लाभत होते.

२. सोहळ्याच्या वेळी स्वतःचे अस्तित्व न जाणवता ‘परात्पर गुरुदेव वार्तालाप घेत आहेत’, असे जाणवणे

प्रत्यक्ष सन्मान सोहळ्याच्या वेळी आम्ही दोघीही व्यासपिठावर होतो. त्या वेळी ‘आम्ही एका वेगळ्याच लोकात आहोत. मी वैकुंठच अनुभवत आहे’, असे मला जाणवत होते. पू. दीपाली यांनाही असेच जाणवत होते. मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते. वार्तालापाच्या वेळी मला सतत परात्पर गुरुदेवांचे स्मरण होऊन त्यांना विचारायची सूत्रे सुचत होती. ‘परात्पर गुरुदेव माझ्या ठिकाणी आहेत आणि तेच पू. दीपाली यांच्याशी वार्तालाप करत आहेत’, असे मला जाणवत होते.

३. मला मधून मधून माझ्या ठिकाणी देवीचे अस्तित्व जाणवत होते.

४. दैवी वातावरणामुळे वेळेचे भान न रहाणे

सोहळ्याच्या वेळी वातावरण दैवी बनले होते. ‘रात्रीचे १० कधी वाजले ?’, हे माझ्या लक्षातही आले नाही. तेव्हा मला आनंद जाणवत होता.’

– (सद्गुरु) सुश्री (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था. (२५.१.२०२२)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक