अमेरिका आणि ‘नाटो’ देश युक्रेनच्या एकेक इंच भूमीचे रक्षण करतील ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

  • रशियाच्या विमानांसाठी अमेरिकेचा आकाशमार्ग बंद !

  • अमेरिकेचे सैन्य युक्रेनमध्ये रशियाविरोधात लढण्यासाठी जाणार नाही !

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका आणि ‘नाटो’ देश युक्रेनच्या एकेक इंच भूमीचे रक्षण करतील. पुतिन यांनी सध्या युद्धाच्या मैदानावर आघाडी मिळवली असली, तरी त्यांना याची किंमत चुकवावी लागेल. पुतिन हे हुकूमशहा असून ही लढाई ‘हुकूमशहा विरुद्ध स्वातंत्र्य’ अशी आहे, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘स्टेट ऑफ युनियन’समोर केलेल्या भाषणात केले.

बायडेन पुढे म्हणाले की,

१. पुतिन यांच्यासमोर आता मोठे संकट उभे रहाणार आहे. त्यांना अजिबात कल्पना नाही की, कोणते संकट त्यांच्यावर येऊ घातले आहे. आज मी ही घोषणा करतो की, आम्ही आमच्या मित्र देशांसमवेत मिळून रशियाच्या कोणत्याही प्रकारच्या विमानांसाठी आमचा आकाशमार्ग पूर्णपणे बंद करत आहे.

२. आमचे सैन्य युरोपमध्ये युक्रेनच्या बाजूने रशियाच्या विरोधात लढण्यासाठी जाणार नाही; मात्र नाटो देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. त्यासाठीच आम्ही आमचे सैन्यदल, नौदल आणि वायूदल सज्ज ठेवले आहे. पोलंड, रुमानिया आणि इस्टोनिया या देशांच्याही सुरक्षेसाठी आम्ही आमचे सैन्य सज्ज ठेवले आहे.

३. अमेरिका आणि ‘नाटो’ देश युक्रेनला ५ सहस्र ५६७ कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य करणार आहेत. आमचे सैन्य युक्रेनमध्ये प्रत्यक्ष युद्धात कोणतीही ढवळाढवळ करणार नाही; मात्र इतर मार्गांनी आम्ही युक्रेनला शक्य ते सर्व साहाय्य करणार आहोत. रशियापासून धोका असू शकतो, अशी शक्यता असणार्‍या भागांमध्ये ‘नाटो’चे सैन्य तैनात करण्यात आले आहे.

४. पुतिन हे सध्या जागतिक समुदायापासून वेगळे पडले आहेत. यापूर्वी पुतिन यांना अशा प्रकारे कधीच एकटे पाडण्यात आले नव्हते. युरोपीयन महासंघातील २७ देश सध्या युक्रेनसमवेत आहेत. ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे.