व्यष्टी आणि समष्टी साधनेची तळमळ, चिकाटी अन् गुरूंवर दृढ श्रद्धा असणार्‍या अकोला येथील सौ. मेघा जोशी (वय ६१ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘भगवंतभेट’ या ऑनलाईन सत्संगात सनातनचे धर्मप्रसारक संत पू. अशोक पात्रीकर यांनी उलगडले गुपित !

सौ. मेघा जोशी यांना श्रीकृष्णाचे चित्र भेट देऊन सत्कार करतांना पू. अशोक पात्रीकर

अकोला – व्यष्टी आणि समष्टी साधनेची तळमळ, चिकाटी अन् पराप्तर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असणार्‍या, तसेच जीवनातील कठीण प्रसंगांवर मात करणार्‍या अकोला येथील सौ. मेघा वसंत जोशी (वय ६१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सनातन संस्थेचे विदर्भ-छत्तीसगड विभागाचे धर्मप्रसारक संत पू. पात्रीकरकाका यांनी २० फेब्रुवारी २०२२ या दिवशी झालेल्या ‘भगवंतभेट’ या ऑनलाईन सत्संगात दिली.

सौ. मेघा जोशी

‘भगवंतभेट’ या ऑनलाईन सत्संगात एका साधिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती ऐकत असतांना उपस्थित सर्व साधक भावावस्थेत होते. तेव्हा पू. पात्रीकरकाका म्हणाले, ‘‘एक अजून आनंदवार्ता गुरुमाऊलीने पाठवली आहे. ती काय असेल ?’’, तेव्हा काही साधकांनी ‘‘सौ. मेघा जोशी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे’, असे वाटते’’, असे उत्तर दिले ! त्यावर ‘‘हीच आनंदवार्ता आहे, सौ. मेघा जोशी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठला असून त्या जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून सुटल्या आहेत !’’, असे पू. पात्रीकरकाकांनी घोषित करताच साधकांचा भाव द्विगुणित झाला.

या वेळी सौ. जोशीकाकू यांचे पती श्री. वसंत जोशी उपस्थित होते. जिल्ह्यातील काही साधक संगणकीय प्रणालीद्वारे जोडले होते. सत्संगाच्या आरंभापासून प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या आणि संगणकीय प्रणालीद्वारे जोडलेल्या साधकांना सत्संगात अधिक चैतन्य अन् आनंद जाणवत होता. पू.पात्रीकरकाकांच्या हस्ते सौ. मेघा जोशी यांनी भगवान श्रीकृष्णाचे चित्र आणि प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सौ. जोशी यांना मनोगत व्यक्त करण्यास सांगितले असता, त्या भावावस्थेत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘ही केवळ आणि केवळ प.पू. डॉक्टरांची कृपा आहे. मी कधी पातळीची अपेक्षाही केली नव्हती.’’

अनेक साधकांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. सौ. मेघा जोशी यांचे यजमान श्री. वसंत जोशी यांनी सांगितले की, माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सौ. जौशी यांना सोलापूर सोडून अकोला येथे जाणे शक्य होत नसे; परंतु सौ. जोशींचा परिस्थिती स्वीकारण्याचा भाग वाढला होता. त्यांनी सर्व सहन केले. त्यांना प्रसारसेवेचा ताण येत नसे. आपल्या प्रेमळ वाणीने त्यांनी सर्वांची मने जिंकली. साधकांच्या अडचणींवर काही सांगता आले नाही, तर त्या पू.पात्रीकरकाकांना विचारून घेत. माझ्या तब्येतीसाठी त्यांनी अमरावतीच्या डॉक्टरांचे औषध घेण्याविषयी सांगितल्यामुळे आम्हाला अकोल्याला यावे लागले आणि हा योग जुळून आला. या विषयी प.पू. गुरुमाउली आणि पू. पात्रीकरकाका यांच्या चरणी कोटी-कोटी कृतज्ञता !

श्री. प्रसाद जोशी (मोठा मुलगा)

या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो. आई आणि बाबा यांनी साधनेसाठी पुष्कळ त्याग केला आहे. बाबांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन साधनेला आरंभ केला, तेव्हा आईने आनंदाने त्यांच्या निर्णयाला सहमती दर्शवली होती.

अकोला येथील सौ. मेघा वसंत जोशी (वय ६१ वर्षे) यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. धीरज राऊत, अकोला

१. प्रेमळ : ‘सौ. मेघा जोशीकाकू प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्यासाठी साधकांना प्रेमाने प्रोत्साहित करतात. काकू युवा साधक आणि धर्मप्रेमी यांच्याशी प्रेमाने जवळीक साधतात.

२. चूक स्वीकारणे : त्यांच्याकडून चूक झाल्यास त्या ती लगेच स्वीकारतात आणि क्षमायाचनाही करतात.

३. साधकांना साहाय्य करणे : साधकांनी काकूंना वैयक्तिक अडचणी विचारल्या, तर त्या सोडवण्यासाठी काकू प्रयत्न करतात. ‘त्यांना कोणतीही अडचण केवळ सांगितल्यावर सहजतेने सुटते’, असे मला वाटते. त्यामुळे मला त्यांचा आधार वाटतो.

४. जाणवलेले पालट

अ. पूर्वी काकू गोंधळलेल्या असायच्या. आता त्या स्थिर राहून आणि पुढाकार घेऊन साधकांच्या अडचणी सोडवतात. कुणालाही सेवेत काही साहाय्य लागले, तर त्या स्वतः तत्परतेने साहाय्य करतात.

आ. त्यांना सेवेत काही अडचणी आल्या, तर त्या अन्य साधकांचे साहाय्य घेऊन अडचणी सोडवतात.’

सौ. रागिणी नंदकिशोर परचुरे, अकोला

१. ‘काकू साधकांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आपुलकीने विचारपूस करतात आणि त्यांनाही नामजप करायला सांगतात.

२. ‘जिल्ह्यातील प्रत्येक साधकाला समष्टी सेवा मिळावी’, अशी काकूंची तळमळ असते. काकू साधकाच्या परिस्थितीनुसार त्यांच्या समष्टी सेवेचे नियोजन करतात.

३. जाणवलेले पालट

अ. पूर्वी त्यांची सेवेविषयी आग्रही भूमिका असायची. त्यामुळे साधक दुखावले जायचे. आता त्या साधकांना सेवेचे महत्त्व समजावून सांगतात आणि साधकांना ताण येऊ न देता त्यांच्याकडून सेवा करवून घेतात.

आ. आता त्या साधकांच्या अडचणी जाणून घेतात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.’

श्रीमती विभा चौधरी, अमरावती

१. ‘काकू नेहमी हसतमुख असतात.

२. त्या सर्वांशी मनमोकळेपणाने बोलतात.

३. साधकांना आधार देणे : काकू जिल्ह्यातील रुग्णाईत आणि वयस्कर साधकांची भ्रमणभाषवर विचारपूस करून त्यांना आधार देतात. दीड वर्षापूर्वी माझ्या यजमानांचे अकस्मात् निधन झाल्यामुळे मी पूर्णपणे खचून गेले होते. तेव्हा काकू मला भ्रमणभाष करून माझे सांत्वन करायच्या. तेव्हापासून मला त्यांचा आधार वाटतो.

४. कृतज्ञताभाव : त्यांच्या मनात साधकांविषयी कृतज्ञताभाव आहे. ‘साधकांच्या साहाय्यानेच मी सेवा करू शकते’, असे त्या नेहमी सांगतात.

५. जाणवलेला पालट : पूर्वी त्यांना भ्रमणभाष किंवा संगणक यांतील तांत्रिक भाग जमत नव्हता. त्यामुळे ‘सेवेत अडचणी येतात’, हे लक्षात घेऊन त्यांनी ते स्वतः शिकून घेतले आणि अन्य साधकांनाही शिकवण्याचे नियोजन केले.’

सौ. शुभांगी कुलकर्णी, अकोला

‘काकूंमध्ये उत्तम नियोजनकौशल्य आहे.’

सौ. श्रुति भट, अकोला

जाणवलेले पालट

अ. ‘आता काकूंच्या बोलण्यात प्रेमभाव जाणवतो.

आ. त्यांची गुरुसेवेची तळमळ वाढली आहे.

इ. त्यांचा चुका स्वीकारण्याचा भाग वाढला आहे.

ई. सेवेला वेळ देण्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले असून आता त्यांचा सेवेचा ध्यास वाढला आहे.

उ. त्यांच्यातील व्यापकत्व वाढले आहे.’

सौ. माधवी रुपदे, अकोला

जाणवलेले पालट

अ. ‘पूर्वी काकू भावनेच्या स्तरावर आणि प्रतिमा जपत सेवा करायच्या. त्यांचा साधकांच्या चुका सांगण्याचा भाग अल्प होता. आता त्या साधकांना मनमोकळेपणाने चुका सांगतात.

आ. आता त्या परिस्थिती सहजतेने स्वीकारतात.’

श्रीमती पाचडे, अकोला

जाणवलेला पालट : ‘पूर्वी काकू सेवेसाठी अन्य साधकांवर अवलंबून रहायच्या. त्यामुळे सेवेवर परिणाम होत असे. आता त्या सेवा करण्यास सक्षम झाल्या आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.’


दोन वर्षे अकोला शहराच्या बाहेर राहूनही सौ. जोशीकाकूंनी प्रसारकार्य समर्थपणे सांभाळले ! – पू. पात्रीकरकाका

पू. अशोक पात्रीकर

सौ. जोशीकाकू कोरोनाचा प्रकोप चालू होण्यापूर्वी त्यांच्या मुलाकडे सोलापूर येथे गेल्या होत्या. नंतर कोरोनामुळे आणि श्री. जोशीकाकांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सोलापूर येथे दोन वर्षे रहावे लागले. त्या काळात सोलापूर येथे राहूनही त्यांनी अकोला जिल्ह्यातील प्रसाराचे दायित्व समर्थपणे सांभाळले. अकोला जिल्ह्यात साधकसंख्या अल्प असूनही त्या सर्व सेवांचे नियोजन साधकांना आणि स्वतःला ताण न येऊ देता करायच्या. पूर्वी त्यांना अध्यात्मप्रसारातील कोणताही उपक्रम राबवतांना ताण यायचा. व्यष्टी साधना वाढवून आणि प.पू. डॉक्टरांना शरण जाऊन त्यांनी ‘ताण घेणे’ या दोषावर मात केली. आढाव्यात भावप्रयोग घेतांना प.पू. डॉक्टरांचे नाव घेतले की, त्यांचा भाव जागृत होतो.


सेवेचा ध्यास असलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या अकोला येथील सौ. मेघा जोशी (वय ६१ वर्षे) !

१. कौटुंबिक दायित्व चांगल्या प्रकारे पार पाडणे

अ. ‘काकू कौटुंबिक स्तरावर स्वतःच्या सेवांचे नियोजन करतात. त्यामुळे त्यांचे घरकामांतही सुनांना साहाय्य होते आणि त्यांना काकूंचा आधार वाटतो.

आ. जोशीकाकांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. काकू त्यांचीही काळजी घेतात आणि सेवाही करतात.

२. साधकांच्या स्थितीचा अभ्यास करून त्यांना सेवा देणे

अकोला जिल्ह्यात साधकसंख्या अल्प आहे. बरेच साधक वयस्कर आहेत, तरीही काकू कोणत्याही उपक्रमाचे नियोजन करतांना ‘साधकांना ताण येत नाही ना ?’, हे लक्षात घेतात आणि साधकांच्या स्थितीनुसार त्यांना सेवेचे दायित्व देतात. त्यामुळे साधकांना सेवेतून आनंद मिळतो.

३. कधी त्यांचे शारीरिक त्रास वाढले, तर त्या भावजागृतीचे प्रयत्न वाढवतात आणि सेवेला प्राधान्य देतात.

४. काकूंचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित होतात. ‘त्यांना समष्टी सेवेचा ध्यास असतो’, असे जाणवते.

५. भाव

त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अपार भाव आहे. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात भावप्रयोग घेतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर’ हा शब्द उच्चारला, तरी त्यांची भावजागृती होते.

६. जाणवलेले पालट

अ. पूर्वी कोणताही उपक्रम जिल्ह्यात राबवायचा म्हटल्यावर त्यांना ताण यायचा. आता त्या ताण न घेता उपक्रमाचे चांगले नियोजन करतात.

आ. आता त्यांचा विचारून कृती करण्याचा भागही वाढला आहे.

– (पू.) अशोक पात्रीकर, अमरावती (१३.१०.२०२१)