हे सत्य असले, तरी भारताने स्वातंत्र्याच्या वेळीच एक मोठा प्रांत गमावला आणि तेथे पाकिस्तान नावाचा देश निर्माण होऊन तो भारताला गेली ७५ वर्षे त्रास देत आहे. पाकच्या आक्रमणानंतर काश्मीरचा मोठा भाग गमावला. वर्ष १९६२ च्या युद्धात भारताने सहस्रो चौरस किमी भूमी गमावली, ती अद्यापही आपण परत मिळवू शकलो नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती असून ती भारताला लज्जास्पद आहे ! – संपादक
नवी देहली – जगात भारत हा एकमेव असा देश आहे, ज्याने आजवरच्या इतिहासात कोणत्याही देशाची एक इंचही भूमी बळकावलेली नाही. भारत सामर्थ्यशाली देश आहे; पण भारताने आपल्या शक्तीचा वापर केवळ जगाच्या शांततेसाठीच केला. भारताने कोणत्याही देशावर दबाव आणण्यासाठी किंवा भीती दाखवण्यासाठी कधी बळाचा वापर केला नाही. भारतानेच जगाला समानता आणि ऐक्याचा संदेश दिला आहे. कोणताही वाद चर्चेतून सोडवण्यासाठी भारताने नेहमीच पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी येथे केले. ते देहली विद्यापिठाच्या ९८ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, भारताला विश्वगुरु बनवणे, हाच आमचा एकमेव उद्देश आहे. एक शक्तीशाली, ज्ञानसमृद्ध आणि मानवी मूल्य जपणारा देश म्हणून आम्हाला भारत घडवायचा आहे. कोरोना संकटाच्या काळात भारताने १७० हून अधिक देशांना मानवतावादी दृष्टीकोनातून साहाय्य केले, त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. हीच भारताची खरी ओळख आहे आणि संस्कार आहेत; मात्र अजूनही या जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत, जे भारताला अपकीर्त करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात, अशी टीकाही त्यांनी केली.