पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

७.२.२०२२ या दिवशी फोंडा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी (वय ८२ वर्षे) संतपदी विराजमान झाल्या. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. मैथिली जोशी पू. आजींकडे त्यांची सेवा करण्यासाठी जातात. त्यांना पू. आजींची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ

१. स्वावलंबी

‘पू. आजींचे वय ८२ वर्षे आहे, तरीही त्या सकाळी उठून स्वतःचा चहा करतात. त्या दुपारी स्वतःसाठी भात बनवतात. या वयातही त्या स्वतःची सर्व कामे स्वतः करतात.

कु. मैथिली जोशी

२. प्रेमभाव

अ. पू. आजींची सेवा करून मी त्यांच्या घरून आश्रमात जायला निघतांना त्या कोकणी भाषेत ‘बरे करू’ म्हणजे ‘चांगले होवो’, असे म्हणत माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात. त्या वेळी मला त्यांचा स्पर्श ऊबदार आणि आधार देणारा वाटतो.

आ. माझी शरीरयष्टी बारीक आहे. त्यामुळे ‘माझा आहार अधिक असावा’, असे पू. आजींना वाटते; म्हणून त्या मला खाऊ खाण्यासाठी विशेष आग्रह करतात.

३. ‘आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, याची काळजी घेणे

अ. एकदा मी त्यांच्या घरी ३ – ४ दिवस रहायला गेले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी मी झाडू घेऊन घराची स्वच्छता करू लागले. हे पाहून त्या विश्रांती घेत असतांनाही उठून आल्या आणि म्हणाल्या, ‘‘अगं, एवढे करू नकोस. माझ्यामुळे तुम्हाला उगाच त्रास होतो.’’ त्यांनी मला केर काढू दिला नाही. शेवटी त्या झोपल्यावर मी घरातील केर काढला.

आ. आमचे जेवण झाल्यावर मी आवरायला घ्यायचे. मी त्यांची भांडी धुवायला घेतल्यावर त्या म्हणत, ‘‘माझी भांडी मी धुते. तू धुऊ नकोस.’’ मी भांडी धुवायला घेतली, तर त्या पटल आवरायला घेत. दुसर्‍या दिवशी त्या पटल आवरतील; म्हणून मी आधी पटल पुसायला घेतले, तर मला साहाय्य व्हावे; म्हणून त्यांनी भांडी धुवायला घेतली.

इ. मी त्यांचे कपडे धुवायला घेतले की, त्या म्हणतात, ‘‘तू माझे कपडे धुऊ नकोस. तसेच ठेव. ३ – ४ दिवसांनी कलाताई येतील, तेव्हा त्या धुतील.’’

ई. त्यांना रात्री पुष्कळ वेळा उठून लघवीला जावे लागते; पण आपल्यामुळे इतरांना जाग येऊ नये; म्हणून त्या सर्व कृती हळूवारपणे करतात.

४. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे

त्यांच्या घरात काही दुरुस्तीची कामे करायची होती; म्हणून काही दिवस त्यांची निवासव्यवस्था अन्यत्र केली होती. त्या वेळी त्यांनी या वयातही ती नवीन जागा आनंदाने स्वीकारली. तेथे खरेतर त्यांना काहीच विरंगुळा नव्हता, तरीही त्या म्हणाल्या, ‘‘येथे किती छान आहे ! निसर्ग दिसतो, लहान मुले खेळतांना दिसतात. मला येथे आवडले.’’

– कु. मैथिली जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०२२)