बेलारूस रशियाच्या बाजूने युद्धात उतरणार !

रशियाला बेलारूसमध्ये अण्वस्त्र तैनात करण्याचीही अनुमती !

जर रशियावर हल्ला झाला तर बेलारूस युद्धात उतरेल – बेलारूसचे राष्ट्रपती अ‍ॅलेक्झेंडर लुकाशेंको

मिन्स (बेलारूस) – रशियाच्या मित्रदेश बेलारूस याने रशियाला त्याच्या देशात अण्वस्त्रे तैनात करून तेथून त्यांचा मारा करण्याची अनुमती दिली आहे. यासाठी बेलारूसने त्याच्या राज्यघटनेमध्ये सुधारणा केली आहे.

१. अमेरिकेने हा निर्णय ‘धोकादायक’ असल्याचे सांगत त्यास विरोध केला आहे, तसेच ‘चीननेही या निर्णयाला विरोध करावा’, असे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रांनीही या कृतीला ‘दायित्वशून्य पाऊल’ असल्याचे सांगत टीका केली आहे.

२. युरोपीयन देश आणि अन्य काही देशांनी रशियाच्या विमानांना त्यांच्या आकाशमार्गाचा वापर करण्यावर बंदी घातली आहे, तसेच जपान आणि युरोपीयन युनियनने व्यापारविषयक ‘स्विफ्ट’ प्रणालीतून रशियाच्या बँकांना बाहेर काढल्याची घोषणा केली आहे.

बेलारूसचे राष्ट्रपती अ‍ॅलेक्झेंडर लुकाशेंको

३. बेलारूसचे राष्ट्रपती अ‍ॅलेक्झेंडर लुकाशेंको यांनी या बंदीचा विरोध करत ‘यामुळे तिसरे महायुद्ध होईल’ अशी भीती व्यक्त केली आहे.