रुद्राक्षधारण

शिवपूजेच्या वेळी रुद्राक्षांची माळ घालावी. नाथ संप्रदायी, वाम संप्रदायी आणि कापालिक हे रुद्राक्षाचा वापर करतात. योगीही रुद्राक्षांच्या माळा धारण करतात.

१. ‘रुद्राक्ष’ शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ

‘रुद्र + अक्ष’ अशा ‘रुद्राक्ष’ शब्दाचे पुढील अर्थ होतात.

अ. अक्ष म्हणजे डोळा. रुद्र + अक्ष म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो, (उदा. तिसरा डोळा) तो रुद्राक्ष. अक्ष म्हणजे आस. डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो; म्हणून त्याला अक्ष म्हणतात.

आ. रुद्र म्हणजे रडका. ‘अ’ म्हणजे घेणे आणि ‘क्ष’ म्हणजे देणे, म्हणून अक्ष म्हणजे घेण्याची किंवा देण्याची क्षमता. रुद्राक्ष म्हणजे रडणार्‍याकडून त्याचे दुःख घेण्याची आणि त्याला सुख देण्याची क्षमता असलेला.

२. रुद्राक्षाची वैशिष्ट्ये

रुद्राक्ष वातावरणातील तेज घेऊन त्याचे तेलात रूपांतर करतो. रुद्राक्षाच्या झाडाखाली बसून शिवाचा जप केल्यास त्यातून सुगंधी तेल २४ घंटे बाहेर येते. रुद्राक्षाच्या भोकातून फुंकर मारल्यावर सुगंधी तेल बाहेर येते. त्याच्या झाडापासूनही तेल काढतात.

३. रुद्राक्षाचे कार्य

अ. रुद्राक्ष विश्वातील देवांच्या प्रकाशलहरींचे मानवाच्या शरिरातील नादलहरींत, नादलहरींचे प्रकाशलहरींत रूपांतर करतो. यामुळे देवांच्या लहरी मानव ग्रहण करू शकतो आणि मानवाच्या विचारांचे देवांच्या भाषेत रूपांतर होते.

आ. रुद्राक्ष सम (सत्त्व) लहरी ग्रहण करतो, तसेच त्याच्या उंचवट्यातून सम लहरी बाहेर फेकल्या जातात. खरा रुद्राक्ष बोटात धरला, तर स्पंदने जाणवतात. त्या वेळी शरीर रुद्राक्षातून निघणार्‍या सम लहरी ग्रहण करत असते.

इ. कोणत्याही देवतेचा जप करण्यास रुद्राक्षमाळ चालते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शिवाच्या उपासनेमागील शास्त्र’)