नाशिक – १२ नोव्हेंबर २०२१ या दिवशी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणार्या मालेगाव दंगलप्रकरणी सत्र न्यायालयाने १८ संशयितांचा जामीन २४ फेब्रुवारी या दिवशी फेटाळला आहे. मालेगाव येथील दंगलीत अनेक हिंदु दुकानांची जाळपोळ आणि मोडतोड करण्यात आली होती. यात अनेक जण घायाळही झाले होते. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत ५ गुन्हे नोंद आहेत. त्यात शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या २ गुन्ह्यांतील ९, तर आयेशानगर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील ९ जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र या संशयितांची चौकशी पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी पोलिसांनी केली. न्यायाधिशांनी हा युक्तीवाद ग्राह्य धरत १८ संशयितांचा जामीन फेटाळला आहे.
रजा अकादमीवर आरोप !मालेगाव दंगलप्रकरणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी रजा अकादमीवर आरोप केले होते. दंगलप्रकरणी अटक केलेला एक नगरसेवक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. १ संशयित नगरसेवक जनता दलाचा आहे. मुंबई येथे रजा अकादमीच्या काही लोकांना पैसे वाटले. दंगलीच्या एक दिवस अगोदरच्या रात्री दंगेखोरांनी दगड आणून ठेवले होते. २० वर्षांपासून मालेगाव शांत आहे; मात्र काही जण ते जाणीवपूर्वक पेटवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता. येणार्या काळात मालेगाव महापालिकेची निवडणूक आहे. त्या तोंडावर हा जामीन फेटाळण्यात आला आहे. यातील अनेक संशयित हे विविध राजकीय पक्षांशी निगडित आहेत. त्यामुळे त्यांना जोरदार धक्का बसला आहे. |
नेमके प्रकरण काय ?मालेगाव येथे झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता. नगरसेवक अयाज हलचल याने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप सिद्ध करून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती. त्यात ‘त्रिपुरा येथे मुसलमान नागरिकांवर अन्याय होत आहे. तेथील दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे’, असे म्हणत ती क्लिप इतर ४ जणांच्या साहाय्याने वेगवेगळ्या व्हॉट्सॲप गटांवर प्रसारित केली होती. ८ नोव्हेंबर या दिवशी हा प्रकार घडला होता. यावरून दंगल उसळली. या प्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचलसह इतर संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. |