पुतिन यांच्या विरोधात रशियातील ५१ शहरांत आंदोलन : १ सहस्र ४०० आंदोलकांना अटक !

मॉस्को – युक्रेनवरील आक्रमणाच्या निषेधार्थ रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात रशियातील ५१ शहरांमध्ये आंदोलन करण्यात आली. पोलिसांनी हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत १ सहस्र ४०० आंदोलकांना कह्यात घेतले. यामध्ये राजधानी मॉस्कोतील ७००, तर सेंट पीटर्सबर्ग येथील ३४० जणांचा समावेश आहे. यासह अन्य ठिकाणांहूनही आंदोलकांना कह्यात घेण्यात आले आहे. या आंदोलकांनी ‘रशियाने युक्रेनशी चर्चेद्वारे वाटाघाटी करून मार्ग काढावा’, अशी मागणी केली आहे. आंदोलकांनी आता ‘युद्ध नको’ अशा आशयाचा मजकूर लिहिलेले फलक हातात धरले होते.

रशियातील फोफावलेल्या भ्रष्टाचारावरून रशियन नागरिकांचे लक्ष वळवण्यासाठी युक्रेनवर आक्रमण ! – एलेक्सी नवलनी

एलेक्सी नवलनी

पुतिन यांचे रशियातील कट्टर विरोधक समजले जाणारे एलेक्सी नवलनी यांनी एका स्थानिक दूरचित्रवाहिवर बोलतांना सांगितले की, रशियात फोफावलेला भ्रष्टाचारावरून रशियन नागरिकांचे लक्ष वळवण्यासाठी पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण केले आहे.