मृत्यूसमयी जीवनातील बहुतेक सर्व घटना व्यक्तीला वेगाने आठवत असल्याचे संशोधनाअंती उघड !

  • ‘मरतेवेळी जीवन आठवते’ या सिद्धांताला पुष्टी

  • शास्त्रज्ञांनी मृत्यूशय्येवरील व्यक्तीच्या मेंदूमधील क्रियेच्या केलेल्या नोंदीचा निष्कर्ष

ब्रिटन – व्यक्तीच्या मृत्यूसमयी तिला जीवनातील बहुतेक सर्व घटना वेगाने आठवत असल्याचे शास्त्रज्ञांनी मृत्यूशय्येवरील एका व्यक्तीच्या नुकत्याच केलेल्या संशोधनाअंती उघड झाले आहे. या संशोधनामुळे ‘मरतेवेळी व्यक्तीच्या मेंदूमध्ये नेमकी काय प्रक्रिया घडते ’, हे समोर आले आहे. शास्त्रज्ञांनी मृत्यूशय्येवरील मानवी मेंदूची क्रिया नोंदवण्याची ही पहिलीच वेळ होती.

शास्त्रज्ञांनी ह्रदयविकाराचा झटका आलेल्या एका ८७ वर्षीय व्यक्तीच्या मेंदूमधील क्रियेची ‘इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी’ (ईईजी) (ईईजी ही मेंदूची विद्युत क्रिया नोंद करण्याची एक पद्धत आहे) पद्धतीच्या माध्यमातून चाचणी केली. या वेळी मरणासन्न स्थितीत असलेल्या त्या व्यक्तीची ‘तिचे ह्रदय बंद पडण्यापूर्वी ९०० सेकंदांमध्ये तिच्या मेंदूमध्ये काय प्रक्रिया घडते ?’ याची नोंद करण्यात आली, तसेच अगदी अखेरच्या ३० सेकंदांमध्ये मेंदूंमधील क्रिया नोंदवण्यात आली. या वेळी त्यांना अगदी शेवटच्या क्षणी व्यक्तीच्या मेंदूत तिच्या जीवनातील बहुतेक सर्व घटनांच्या स्मृती तिच्या डोळ्यांसमोर वेगाने येत असल्याचे आढळून आले, असे ब्रिटीश कोलंबियामधील ‘वँकोव्हर जनरल हॉस्पिटल’ चे शास्त्रज्ञ डॉ. झेम्मर यांनी सांगितले. या संशोधनातून ‘मरतेवेळी जीवन आठवते’ या सिद्धांताला पुष्टी मिळाली आहे.