विधवांनी हळदी-कुंकू का करू नये ?

हिंदु धर्मामध्ये संक्रांत, गौरी गणपती, विवाह आदी प्रसंगी सवाष्ण महिलांसाठी, तसेच कुमारिकांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा आहे; मात्र पुरोगामित्वाच्या नावाखाली या परंपरेला छेद देऊन पुण्यातील एका उच्चशिक्षित विधवा महिलेने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गेल्याच वर्षी कोरोनामुळे त्यांच्या पतींचे निधन झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनी हिंदु धर्मातील प्रथा परंपरांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला आहे. पाश्चात्त्य विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन पुरो(अधो)गामी विचारसरणीच्या महिलांमध्ये अशा कृती करण्याची प्रथा पडत चालली आहे. महान भारतीय संस्कृती असलेल्या भारतामध्ये असे होणे, हे दुर्दैवी आहे.

विवाह झालेल्या स्त्रियांसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार आहे. पतीमध्ये क्षात्रतेजरूपी ज्योत सतत तेवत ठेवण्यासाठी सुवासिनी महिला कुंकू कपाळावर किंवा भांगामध्ये लावतात, हे मानसिक आणि आध्यात्मिक या दोन्ही कारणांसाठी महत्त्वाचे आहे. याउलट विधवा स्त्रीमध्ये वैराग्यभाव लवकर निर्माण होऊन तिचा मोक्षप्राप्तीकडे प्रवास व्हावा, या उद्देशाने बाह्यांगाने विधवा स्त्रियांसाठी कुंकू, तसेच अलंकार त्यागण्याची संकल्पना दृढ झाली.

पाश्चात्त्य लोक भारतामध्ये येऊन हिंदु धर्माचे शिक्षण घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण भारतीय मात्र उलट प्रवाहाच्या दिशेने जात आहेत, हे ‘स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे’ आहे. प्राचीन आणि महान भारतीय संस्कृतीमध्ये प्राणिमात्राच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचे आचरण कसे असावे ? मनुष्य जन्माचे सार्थक कसे करावे ? हे आपल्या ऋषिमुनींनी वेद-उपनिषदांमध्ये लिहून ठेवले आहे. त्याचे पालन करून आज कित्येकांनी स्वतःच्या आयुष्याचे सार्थक केले आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंनाच हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात येत नाही.

अन्य धर्मीय मात्र त्यांच्या प्रथा, परंपरा यांचे पालन करण्यासाठी पुढे सरसावतात. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास महिलांनी हिजाब परिधान करणे. हिंदु महिलांनी हिंदु धर्मामध्ये सांगितलेल्या प्रत्येक धार्मिक कृतीचे महत्त्व समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करणे सर्वदृष्ट्या लाभदायी आहे. हिंदु धर्मातील प्रत्येक कृतीकडे सकारात्मकदृष्ट्या पाहून त्याप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे. यासाठी सरकारनेही हिंदूंना धर्मशिक्षण द्यावे, हीच हिंदूंची अपेक्षा आहे.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे