पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज (वय ८० वर्षे) यांनी ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ झाल्यानंतर केलेले तीर्थाटन, त्या वेळी झालेल्या संतभेटी आणि त्यांना आलेल्या अनुभूती !
२०.१२.२०२१ या दिवशी प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी सोहळा’ (टीप) पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील गौतमारण्य आश्रमातील श्रीराम पंचायतन मंदिर परिसरात झाला.
(टीप – वयोमानपरत्वे व्यक्तीच्या इंद्रियांची क्षमता उणावते. ‘ती क्षमता टिकून रहावी’, यासाठी धर्मशास्त्रात वयाच्या ८० व्या वर्षी ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ करण्यास सांगितला आहे.)
या विधीनंतर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रकृती उत्तम रहावी, साधकांच्या साधनेतील अडथळे दूर व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यांसाठी प.पू. दास महाराज यांनी १ सहस्र ३०० कि.मी. प्रवास करून त्यांचे गुरु भगवान श्रीधरस्वामी यांच्या समाधीस्थळी आणि अन्य तीर्थक्षेत्री जाऊन प्रार्थना केल्या. त्या वेळी त्यांच्या अनेक संत आणि मठाधीश यांच्याशी भेटी झाल्या.
माघ कृष्ण पक्ष सप्तमी (२३.२.२०२२) या दिवशी प.पू. दास महाराज यांचा ८० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांनी त्यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’नंतर केलेले तीर्थाटन, त्या वेळी झालेल्या संतभेटी आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. कालच्या अंकात आपण ‘प.पू. दास महाराज यांनी कर्नाटकातील वरदहळ्ळी येथे भगवान श्रीधरस्वामींच्या समाधीस्थळाचे घेतलेले दर्शन आणि किन्नीगोळी येथे प.पू. देवबाबा यांचे घेतलेले दर्शन’ हा भाग पाहिला. आता पुढील भाग पाहूया.
(भाग २)
भाग १ पहाण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/555607.html
मंगळुरू, कर्नाटक येथील सेवाकेंद्रातील सर्व संतांच्या भेटी होणे
‘प.पू. देवबाबांचे आशीर्वाद घेऊन आम्ही मंगळुरू सेवाकेंद्रात गेलो. तिथे पूर्वी पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ झाले होते. तेव्हा माई (पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक) तिथे आल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी सेवाकेंद्र पाहिले नव्हते. तिथे गेल्यानंतर आमची पू. विनायक कर्वेमामा (सनातनचे २३ वे संत, वय ८१ वर्षे), पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी (सनातनच्या ४४ व्या संत, वय ८४ वर्षे) आणि पू. भार्गवराम प्रभु (सनातनचे पहिले बालसंत, वय ४ वर्षे) यांच्याशी भेट झाली. – प.पू. दास महाराज (१४.२.२०२२)
४ इ. उडुपी (कर्नाटक) येथील आदमार मठ
४ इ १. आदमार मठात श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन बाहेर पडतांना तेथील मठाधीश श्री कृष्णप्रियातीर्थ स्वामी यांचे दर्शन होणे : मंगळुरू येथे महाप्रसाद घेऊन आम्ही उडुपी येथे आलो. सायंकाळी आदमार मठात श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. आम्ही श्रीकृष्णाच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडत असतांना मठाधीश श्री कृष्णप्रियातीर्थ स्वामी समोर आले. आम्ही त्यांना नमस्कार केला. ते पूजेसाठी मंदिरात जात होते.
४ इ २. श्री कृष्णप्रियातीर्थ स्वामी यांनी प्रसाद आणून दिल्यावर ‘भगवान श्रीकृष्णाने, म्हणजेच परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रसाद दिला’, असे जाणवणे : आम्हाला पाहून कृष्णप्रियातीर्थ स्वामी पुन्हा खोलीत गेले आणि त्यांनी प्रसाद आणून दिला. आमच्या समवेत स्थानिक साधक श्री. रवि कामत होते. ते म्हणाले, ‘‘पूजेला जातांना मठाधीश परत माघारी फिरत नाहीत किंवा असा प्रसादही आणून देत नाहीत. आम्ही आजपर्यंत असे पाहिले नाही. हा प्रसंग अत्यंत दुर्लभ आहे.’’ तेव्हा ‘साक्षात् भगवान श्रीकृष्णाने, म्हणजेच परात्पर गुरुदेवांनी आम्हाला प्रसाद दिला’, असे आम्हाला जाणवले.
श्री कृष्णप्रियातीर्थ स्वामी यांनी मठाधीश होण्याआधी २ वर्षे या मठात श्रीकृष्णाची पूजा केली आहे. ते दिवसातून १४ वेळा पूजा करायचे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आता त्यांचे वय ३७ वर्षे आहे.
४ ई. गोकर्ण आणि मुरुडेश्वर, कर्नाटक
४ ई १. गोकर्ण येथे स्वयंभू शिवलिंगाचे आणि पुढे मुरुडेश्वर येथे भगवान शंकराचे दर्शन घेणे : दुसर्या दिवशी आम्ही उडुपीहून गोकर्णला आलो. तिथे स्वयंभू शिवलिंग (आत्मलिंग) आहे. आम्ही त्याचे दर्शन घेतले. त्याच भागात असलेल्या मुरुडेश्वर येथे जाऊन आम्ही भगवान शंकराचे दर्शन घेतले.
४ ई २. वरील दोन्ही तीर्थस्थळी केलेल्या प्रार्थना ! : आम्ही या दोन्ही तीर्थस्थळी प्रार्थना केली. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत जी विघ्ने येत आहेत, ती दूर व्हावीत. हिंदु राष्ट्र-स्थापनेचे जनक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्राणशक्ती मिळावी. त्यांच्या उपस्थितीत आम्हा सर्व साधकांकडून हिंदु राष्ट्राची स्थापना करवून घ्यावी. ‘कोरोनासारख्या व्याधींमुळे साधकांच्या साधनेत अडथळे येत आहेत. ते दूर व्हावेत’, यासाठी हे कैलासनाथा, महादेवा, ‘तुझे संरक्षककवच लाभू दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !’
आम्ही गोकर्णहून रात्री मडगाव (गोवा) येथे आलो आणि दुसर्या दिवशी सकाळी मडगावहून बांद्याला पोचलो.
५. प्रवासात अनुभवलेली गुरुकृपा !
५ अ. शारीरिक व्याधींमुळे एरव्ही पुष्कळ त्रास होणे; मात्र या प्रवासात श्रीरामाच्या कृपेने कोणताही त्रास न होणे : इतका दीर्घ प्रवास करणे माझ्या प्रकृतीला शक्य नव्हते; कारण मधुमेहामुळे मला दिवसातून तीन वेळा ‘इन्सुलिन’ घ्यावे लागते. माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण अल्प-अधिक होते. वयोमानामुळे जडलेल्या व्याधींमुळे मला दिवसातून १५ ते २० गोळ्या घ्याव्या लागतात. मला जेवणाचीही अनेक पथ्ये आहेत. मला ठराविक वेळी आणि ठराविक प्रमाणातच आहार घ्यावा लागतो. माझ्या एका पायाचा अपघात झाल्याने मी पुष्कळ वेळ एका ठिकाणी बसू शकत नाही, तरीसुद्धा श्रीरामाच्या कृपेने मी सलग ४ – ५ घंटे बसून प्रवास करू शकलो. मला मिळालेल्या आध्यात्मिक शक्तीमुळे हा प्रवास करणे मला शक्य झाले.
५ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने समवेत असलेल्या साधकांचे दायित्व पार पाडता येणे : माझ्या समवेत चालकासह एकूण ११ साधक होते. माझ्यावर त्यांचेही दायित्व होते. ते दायित्वही मला पार पाडता आले. हे शारीरिक नव्हे, तर केवळ आध्यात्मिक शक्तीमुळेच शक्य झाले. हा प्रवास केवळ सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प्रभु श्रीराम यांच्या कृपेने शक्य झाला.
५ इ. प्रवास करतांना आलेल्या अनुभूती
१. पूर्ण प्रवासात मला कधीच ‘थकवा किंवा अंगदुखी’, असे काही जाणवले नाही.
२. जेवण आणि झोप वेळी-अवेळी झाले, तरी माझ्या रक्तातील साखर सामान्य होती.
३. मला एक वेगळाच उत्साह जाणवत होता. सकाळी उठल्यावर माझा जो उत्साह आणि कार्यक्षमता असायची, तसाच उत्साह रात्री १२ वाजेपर्यंत, म्हणजे झोपेपर्यंत असायचा.
४. पूर्ण दिवस माझी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती एकसारखीच होती.
५. आपल्या ऋषिमुनींनी जी कर्मकांडे किंवा व्रतवैकल्ये सांगितली आहेत, त्यांचे महत्त्व माझ्या लक्षात आले आणि मला त्यांची अनुभूती आली.
६. हा सर्व प्रवास १ सहस्र ३०० कि.मी. इतका झाला. मी करत असलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा मंत्रजप १३ अक्षरी आहे. या दोन्ही संख्यांमध्ये साम्य आहे.
६. कृतज्ञता
श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या संकल्पाने माझा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ सोहळा झाला. त्यातून मला आध्यात्मिक बळ मिळाले. त्यामुळे मला हा प्रवास करणे शक्य झाले. ‘श्री गुरूंच्या संकल्पात किती शक्ती असते !’, हे मी अनुभवले. ही अनुभूती दिल्याबद्दल मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।’
– आपला चरणसेवक,
प.पू. दास महाराज, पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (१४.२.२०२२)
(समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |