मनीष जाधव यांने बनवले भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणापासून रक्षण करणारे उपकरण

हातीव (संगमेश्‍वर) येथील शाळेत बनवलेल्या उपकरणाची ‘इन्स्पायर पुरस्कार’ स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड

देवरुख – संगमेश्‍वर तालुक्यातील हातीव नं. १ शाळेच्या विज्ञान उपकरणाची ‘इन्स्पायर पुरस्कार’ (केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने वर्ष २००९ पासून ही पुरस्कार योजना चालू झाली.) स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाली आहे. जिल्ह्यातून सहभागी झालेल्या ७७ उपकरणांतून ८ उपकरणांची निवड राज्यस्तरावर करण्यात आली. प्राथमिक शाळांमधून निवड झालेली ही एकमेव शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थी मनीष जाधव याने भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी ‘इलेक्ट्रिक स्टिक फॉर प्रीव्हेंशन फ्रॉम स्ट्रीट डॉग’ (भटक्या कुत्र्याच्या आक्रमणापासून संरक्षण करणारी काठी) हे उपकरण बनवले आहे.

श्री. सुनील करंबेळे या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मनीषने लाकडाची फळी, पीयुसी पाईप, तार, बॅटरी आणि ‘स्वीच’ यांचा वापर करून हे उपकरण सिद्ध केले आहे. सर्व हिंस्र प्राण्यांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी असणारे हे उपकरण कुठेही चार्ज करता येईल, असे आहे. या उपकरणाचा उपयोग सकाळी चालण्याचा व्यायाम करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले आणि शेतात काम करणारे शेतकरी यांना होऊ शकतो.

या उपकरणांच्या यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक सुनील करंबेळे म्हणाले की, आमच्या शाळेचे ‘कुंभाराचे चाक’ हे उपकरण यापूर्वी राज्यस्तरासाठी निवडले गेले होते. तसेच ‘हिरकाढणी’ यंत्रालाही तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला होता. शाळेच्या या यशामध्ये मुख्याध्यापक धोंडू करंबेळे यांचे मार्गदर्शन आणि शिक्षक विनय होडे, श्रीकांत केसरकर, रूपाली मांगले यांचे सहकार्य लाभले आहे.

या यशाबद्दल मनीष जाधव आणि शिक्षक सुनील करंबेळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.