रशियाकडून युक्रेनमधील दोन प्रांतांना ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून मान्यता !

  • जगभरात खळबळ

  • तिसर्‍या महायुद्धाचे पडघम

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाची शक्यता पहाता भारताने आतापासून पूर्ण सिद्धता केली पाहिजे, असेच जनतेला वाटते ! – संपादक

मॉस्को – रशियाने युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या २ प्रांतांना ‘राष्ट्र’ म्हणून मान्यता दिली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जनतेला संबोधित करतांना ही घोषणा केली. रशियाच्या या धक्कादायक निर्णयामुळे रशिया-युक्रेन वाद अधिक चिघळला असून त्याचे पर्यावसान तिसर्‍या महायुद्धात होण्याचे संकेत मिळत आहेत. रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

व्लादिमार पुतिन

‘स्वतंत्र राष्ट्र’ घोषित करण्याची फुटीरतावादी नेत्यांकडून रशियाला विनंती !

‘आपल्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी आणि युक्रेनच्या सैनिकी आक्रमणाविरुद्ध संरक्षणासाठी सैनिकी साहाय्य करावे’, अशी विनंती फुटीरतावादी नेत्यांनी पुतिन यांना केली होती. त्यानुसार डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून मान्यता देण्याच्या करारावर पुतिन यांनी स्वाक्षरी केली. रशियाने या दोन्ही प्रांतांमध्ये सैन्य तैनात करण्यास आरंभ केला आहे.

हा निर्णय फार पूर्वी व्हायला हवा होता ! – रशिया

जनतेला संबोधित करतांना पुतिन यांनी म्हणाले, ‘‘युक्रेन हा रशियाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. पूर्व युक्रेन ही प्राचीन रशियन भूमी आहे. डॉनेत्स्क आणि लुहान्स्क येथील नागरिकांच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व या संबंधीचा हा निर्णय फार पूर्वीच घेतला जाणे आवश्यक होते. रशियाची जनता माझ्या निर्णयाचे स्वागत करील.’’

पाश्‍चात्त्य देशांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा ! – युक्रेन

पुतिन यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की म्हणाले, ‘‘आम्हाला कसलीही भीती नाही. पाश्‍चात्त्य देशांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे.

युरोपीय महासंघ, नाटो यांच्यासह अमेरिकेकडून निषेध !

रशियाच्या या निर्णयाचा युरोपीय महासंघ, नाटो (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’) यांच्यासह अमेरिका आणि इतर देशांनी निषेध केला आहे. रशियाने घेतलेला निर्णय आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असून युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांवर आक्रमण असल्याचे या देशांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी फ्रान्स आणि जर्मनी यांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली आहे. या चर्चेत रशियाला उत्तर देण्यावर एकमत झाले असल्याचे सांगण्यात येते. ब्रिटनने रशियावर कठोर निर्बंध लादण्याची मागणी केली आहे.