नाट्यचित्रपट सृष्टीसारख्या मायावी जगात राहूनही निर्व्यसनी असणारे निग्रही मनाचे कै. राजा नेने !

‘माझे (श्रीमती अनुपमा देशमुख यांचे) वडील आणि सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेने यांचे पती कै. राजा नेने हे नाट्यचित्रपट सृष्टीत असूनही त्यांनी कधीही, कुठलेही व्यसन केले नाही. त्यांना कधीच पान किंवा तंबाखू खाणे, सिगारेट ओढणे, मद्य पिणे, अशी व्यसने नव्हती. २१ फेब्रुवारी या दिवशी कै. राजा नेने यांची पुण्यतिथी असून त्या निमित्ताने माझ्या काही हृद्य आठवणी येथे दिल्या आहेत.

कै. राजा नेने
पू. (श्रीमती) शालिनी नेने

१. औषध म्हणून पान खाणे; पण तेही सोडून देणे

१ अ. कै. राजा नेने यांना होणारा अर्धशिशीचा त्रास कुठल्याही उपचाराने न्यून न होणे, तेव्हा एकाने त्यांना प्रतिदिन विड्याचे पान खाण्यास सांगणे : एकदा माझ्या बाबांनी (कै. राजा नेने यांनी) ‘प्रभात फिल्म कंपनी’मध्ये शांता आपटे आणि केशवराव दाते यांच्यासमवेत ‘कुंकू’या चित्रपटात काम केले होते. तेव्हा त्यांना अर्धशिशीचा अतिशय तीव्र त्रास होत होता. आधुनिक वैद्यांची औषधे, घरगुती औषधे इत्यादी सर्व उपाय झाले. कुठल्याच औषधाने त्यांचे डोके दुखायचे थांबायचे नाही. त्यांना त्याचा असह्य त्रास व्हायचा. त्यांचे डोके सारखे दाबून द्यावे लागायचे.’ तेव्हा कुणीतरी त्यांना सांगितले, ‘तुम्ही त्रयोदशगुणी विडा (सुपारीसह १३ पदार्थ घालून केलेला विडा) प्रतिदिन खाल्ला, तर तुमची डोकेदुखी थांबेल.’ पूर्वी त्यांनी कधी पान खाल्ले नव्हते; पण डोकेदुखीवर उपाय म्हणून त्यांनी पान खाणे चालू केले.

१ आ. शांताराम बापू यांना ‘पान कधीच खाणार नाही’, असे वचन देऊन ते शेवटपर्यंत पाळणे ः बाबांनी डोकेदुखीवर उपचार म्हणून पान खायला चालू करून ३ – ४ दिवसच झाले होते. त्या सुमारास एकदा ‘प्रभात कंपनी’मध्ये बाबा तोंडात पानाचा विडा घालत असतांना नेमके शांताराम बापू समोरून आले. बाबांना विडा खातांना पाहून लगेच शांताराम बापू त्यांना म्हणाले, ‘‘राजा, पान खातोस ? हो, बरोबर आहे. आम्हीच तुला ‘कुंकू’ या चित्रपटात सिगरेट ओढायला लावली.’’ तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘नाही अण्णा ! सध्या माझे डोके फार दुखत आहे. सर्व उपाय केले; पण डोकेदुखीवर एक उपाय; म्हणून मी आता विडा खातो आहे; पण हे बघा, आता तुमच्या समोरच मी हा तोंडातील विडा काढून टाकतो आणि यापुढे उपचार म्हणूनही अशा गोष्टी करणार नाही.’’ बाबा शांताराम बापूंना गुरु मानत असत. त्यानंतर त्यांनी आपल्या गुरूंना दिलेले वचन शेवटपर्यंत पाळले.

२. मद्य पिण्याचा मोह होऊनही त्यावर मात करणे

श्रीमती अनुपमा देशमुख

२ अ. कै. राजा नेने मुंबई येथे एका चित्रपटाचे चित्रीकरण असतांना तेथे रहायला आले असतांना त्यांनी ‘मला आयुष्यात एकदा मद्य घेण्याचा मोह झाला होता’, असे सांगणे : माझे वडील अधूनमधून आमच्याकडे मुंबईला यायचे. चित्रीकरण असतांना ते आमच्याकडे रहायलाही यायचे.’ तेव्हा एकदा गप्पा मारतांना माझ्या यजमानांनी त्यांना विचारले, ‘बापू, एखाद्या वेळी मद्य घेऊन बघावे’, असा मोह तुम्हाला झाला नाही का ?’ तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘केवळ एकदाच झाला; पण तेव्हाही मी मद्य घेतले नाही. मी तो मोह टाळू शकलो.’’

२ आ. उटकमंडला पुष्कळ थंडी असतांना रात्री चित्रपटात काम करणार्‍या केवळ दोघे सोडून सर्वांनी मद्य पिणे ः ‘श्रीमान सत्यवादी’ या चित्रपटाचे चित्रीकरण उटकमंडला (तमिळनाडूला) चालू होते. त्यात राज कपूर हे मुख्य नायकाची आणि शकिला ही मुख्य नायिकेची भूमिका करत होती. त्या चित्रपटात माझ्या वडिलांनी राज कपूरच्या वडिलांचे काम केले होते. त्यांनी या चित्रपटाचे थोडे दिग्दर्शनही केले होते. तेव्हा उटकमंडला पुष्कळ थंडी होती; म्हणून रात्री सर्व जण मद्य प्यायला बसायचे. अनुमाने १०० जणांमधील ९८ जण पिणारे होते. केवळ २ जणच न पिणारे होते. एक म्हणजे महमूद आणि दुसरे राजा नेने.

२ इ. राज कपूर आणि इतरांनी आग्रह करूनही वडिलांनी मद्य न पिणे ः महमूद मद्य घेणारे नव्हतेच. त्यांना राज कपूर यांच्यासह पुष्कळ जणांनी आग्रह करून पाहिला होता; पण त्यांनी कधीच मद्य घेतले नाही. त्यामुळे त्यांना कुणी आग्रह करत नसे. माझ्या बाबांना राज कपूर म्हणाले, ‘‘राजाभाई, थोडा-थोडा ले लो ना, हमारे साथ । कंपनी (साथ) देने के लिए बिलकूल एक घूंट लोगे, तो भी अच्छा लगेगा ।’’ मग सर्व जण बाबांना म्हणायला लागले, ‘‘राजाभाऊ, राज कपूरसाहेब स्वतः आग्रह करत आहेत, तर त्यांचा मान राखण्यासाठी तरी तुम्ही थोडे मद्य घ्या.’’ तेव्हा एक क्षण बाबांना वाटले, ‘हा फार मोठा कलाकार आहे. त्याचा मान राखण्यासाठी आपण एक घोटच घेऊया’; पण त्या क्षणीही त्यांनी एक घोटही मद्य घेतले नाही.

२ ई. अधिकच्या भूमिका मिळण्यासाठीही मद्याचा मोह होऊ न देणारे निर्व्यसनी श्री. राजा नेने ! : कदाचित् तेव्हा त्यांनी मद्य घेतले असते, तर त्यांना राज कपूरच्या चित्रपटात कामे मिळाली असती. ‘या मायाविश्वात मद्यसेवनासारख्या गोष्टीमुळे संपर्क अधिक वाढतात आणि त्यामुळे अधिक कामे मिळतात’, असे आहे; पण तरीही त्यांनी त्या दिवशी मद्य घेतले नाही. त्याविषयी सांगतांना ते मला म्हणाले, ‘‘एवढेसे मद्य घेऊन मला काही व्यसन लागणार नाही’, याची मला पूर्ण निश्चिती होती; पण त्या दिवशी मला वाटले, ‘आज मी मद्य घेतले, तर मी जन्मभर स्वतःला क्षमा करू शकणार नाही’; म्हणून मी त्या दिवशीही मद्य घेतले नाही.’’

– श्रीमती अनुपमा देशमुख, पुणे. (२५.२.२०२१)


श्री. राजा नेने यांनी ‘रामशास्त्री’ या चित्रपटात नव बालकलाकारांकडून ‘दोन घडीचा डाव ।’, या गीताचे उत्तम सादरीकरण करून घेतल्याने दिग्गज सिनेअभिनेत्याला ते गीत आवडणे

‘श्री. राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रामशास्त्री’ या चित्रपटात ‘दोन घडीचा डाव ।’, हे गाणे आहे. या चित्रपटामध्ये बेबी शकुंतला आणि अनंत मराठे या नव बालकलाकारांनी छोटा राम अन् त्याची पत्नी जानकी यांचे काम केले होते. त्या दोघांना काहीच अनुभव नसल्याने त्यांच्याकडून हे सादर करून घेणे, हे अतिशय कौशल्याचे काम होते. माझे वडील श्री. राजा नेने एका समारंभाला गेले होते. तिथे सिनेअभिनेता दिलीप कुमार आले होते. ते माझ्या वडिलांना म्हणाले, ‘‘आपके मराठी सिनेमाका ‘दोन घडीचा डाव’ ये गाना मुझे बहुत अच्छा लगता है ।’’

१. पेशव्यांच्या काळातील न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांच्या जीवनातील कथा

रामशास्त्री प्रभुणे लहान असतांनाच त्यांचे वडील वारतात. त्यांच्या कुटुंबाला २ वेळच्या जेवणाचीही भ्रांत असते. त्यामुळे रामचे पाठशाळेतील शिक्षण झालेले नसते. एक दिवस त्याचे मामा येतात आणि त्याला म्हणतात, ‘‘राम, पाठशाळेत शिकलेल्यांना पेशवे दक्षिणा देत आहेत. तूही माझ्याबरोबर चल.’’ तेव्हा राम म्हणतो, ‘‘मामा, मी शिकलो नाही. त्यामुळे मी खोटे सांगून दक्षिणा घेणार नाही.’’ मामा बळजोरीने त्याच्या दंडाला धरून त्याला घेऊन जातात.

२. अत्यंत गरीबी असतांनाही शिक्षण घेतलेले नसल्याने पेशव्यांकडून मिळालेली दक्षिणा परत करणे

पेशव्यांकडे गेल्यावर दक्षिणा घेण्यासाठी रांग असते, त्यात दोघे उभे रहातात. रामची वेळ आल्यानंतर दक्षिणा देतांना पेशवे रामला विचारतात, ‘‘तुझे पाठशाळेत शिक्षण झाले आहे ना ?’’ राम गप्प बसतो; पण मामाच पुढे होऊन ‘‘हो. झाले आहे’’, असे म्हणत रामचा हात बळजोरीने पुढे करतात. पेशवे त्याच्या हातावर दक्षिणा ठेवतात. मामा त्याला घरच्या वाटेवर सोडून आपल्या घरी जातो. संपूर्ण रस्ताभर रामच्या मनात विचार येत असतात की, ‘मी खोटे बोललो.’ त्यामुळे तो परत वळतो आणि पेशव्यांकडे जाऊन त्यांना सांगतो, ‘‘क्षमा करा. मी शिक्षण घेतलेले नाही.’’ त्यांनी दिलेली दक्षिणा तो त्यांना परत देतो.

३. आई आणि पत्नी यांनी रामचे वागणे योग्य असल्याचे सांगितल्यावर पती-पत्नीने पुढील गीत गाणे

घरी आल्यानंतर राम त्याच्या आईला आणि पत्नीला ही हकीकत सांगतो. त्यावर त्या दोघीही रामला म्हणतात, ‘चांगले काम केले आहे. तू काही चुकीचे केले नाहीस.’ त्यानंतर त्या आनंदात राम आणि जानकी (रामची पत्नी) यांनी पुढील ‘दोन घडीचा डाव’ हे गाणे गायलेले आहे.

दोन घडीचा डाव ।
त्याला जीवन ऐसे नाव ।। धृ. ।।

जगताचे हे सुरेख अंगण ।
खेळ खेळूया सारे आपण ।
रंक आणखी राव ।। १ ।।

माळ यशाची हासत घालू ।
हासत हासत तसेच झेलू ।
पराजयाचे घाव ।। २ ।।

मनासारखा मिळे सवंगडी ।
खेळाला मग अवीट गोडी ।
दुःखाला नच वाव ।। ३ ।।

४. शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे पेशव्यांचा सरन्यायाधीश रामशास्त्री होणे

नंतर राम काशीला जाऊन शिक्षण घेण्याचा निर्धार करतो. रात्री त्याची आई आणि पत्नी झोपलेली असतांना तो रांगोळीने घराबाहेर ‘मी शिक्षणासाठी काशीला जात आहे’, असे वाक्य लिहितो आणि निघून जातो. पुढे काशीला जाऊन पुष्कळ कष्ट घेऊन तो शिक्षण पूर्ण करतो. तोच राम मोठा झाल्यावर मराठा साम्राज्याचे सरन्यायाधीश रामशास्त्री बनतो.

५. सरदारांच्या दबावाला न जुमानता रामशास्त्रींनी नारायणराव पेशव्याच्या खुनाबद्दल रघुनाथराव पेशव्यांना मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावणे

रघुनाथरावांची पत्नी आनंदीबाई हिने त्यांचे कान भरून त्यांच्याकडून ‘नारायणरावाला धरावे’ असे लिहून घेतले; पण आनंदीबाईचा नारायणरावाला मारण्याचा कट होता. त्यामुळे तिने ‘ध’च्या ठिकाणी मा’, असे लिहून ‘नारायणरावाला मारावे’ असा सेवकांना निरोप दिला. त्यावरून ‘ध’चा ‘मा’ करणे’ ही म्हण पडली. सुमेर सिंह गारदी या माणसाकडून नारायणरावाला मारण्यात आले. रामशास्त्री हे नि:स्पृह न्यायाधीश असल्यामुळे त्यांच्यासमोर हा खटला चालला. त्यांनी रघुनाथराव आणि इतर सरदारांच्या दबावाला न जुमानता नारायणराव पेशव्याच्या खुनाबद्दल रघुनाथराव पेशव्यांना मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावली.’

– श्रीमती अनुपमा देशमुख (सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेने आणि कै. राजा नेने यांच्या कन्या), पुणे (१६.१.२०२२)