संभाजीनगर येथे १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षकास अटक !

  • भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस पोलिसांचा वाढता सहभाग देशासाठी घातक ! – संपादक

  • भ्रष्टाचाराने बरबटलेली पोलीसयंत्रणा कायद्याचे राज्य काय आणणार ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा देणेच आवश्यक आहे. – संपादक

  • भ्रष्टाचाराने पोखरलेली पोलीसयंत्रणा ! – संपादक 

संभाजीनगर – अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वृद्धाच्या विम्यासाठी त्याच्या मुलाला पंचनाम्याची आवश्यकता होती. यासाठी अडवणूक करून १० सहस्र रुपयांची लाच घेतांना दौलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविकिरण कदम (वय ३९ वर्षे) यांना १५ फेब्रुवारी या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

२८ जानेवारी या दिवशी दौलताबाद परिसरात चारचाकी वाहनाच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अपघाताची नोंद होऊन चारचाकी चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या प्रकरणाचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक कदम करत होते. तक्रारदाराच्या वडिलांच्या अपघाताचा पंचनामा आणि विमा यांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ती न्यायालयात द्यायची होती; परंतु पंचनामा करण्यासाठी कदम यांनी टाळाटाळ चालू करून कागदपत्रे देण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच मागितली. त्यानंतर संतप्त झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

याच पोलीस उपनिरीक्षकास वाळूज येथेही लाच प्रकरणात झाली होती कारवाई !

शहर पोलीस दलातील वाळूज येथील वाहतूक निरीक्षक जनार्दन साळुंखे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाळूसाठी ५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक केली होती. त्याच्या १० दिवसानंतर शहर पोलीस दलातीलच पोलीस उपनिरीक्षक कदम लाचेच्या जाळ्यात सापडले. १४ डिसेंबर २०२२ या दिवशी दौलताबाद पोलीस ठाण्यातील कर्मचारी सुरेश कवडे वाळूच्याच प्रकरणात उपाहारगृह चालकाच्या साहाय्याने लाच घेतांना पकडले गेले होते. त्यानंतर २ मासांनी त्याच पोलीस ठाण्यात लाचेची कारवाई झाली. ‘दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बोकाळले असून त्यांना पोलिसांकडून अभय दिले जाते. विशेषत: फार्महाऊसमध्ये होणार्‍या मेजवाण्यांकडेही ‘सोयीस्कर’ दुर्लक्ष केले जात आहे’, अशी चर्चा नागरिकांतून चालू आहे. (लाच प्रकरणातील पोलिसांचे स्थानांतर न करता त्यांना बडतर्फ करून कठोर शिक्षा करणे का आवश्यक आहे ? हे दर्शवणारी घटना ! – संपादक)