नेहरूंच्या भारतात सध्या निम्म्या खासदारांवर गुन्हे नोंद ! – सिंगापूरच्या पंतप्रधानांची स्पष्टोक्ती

भारत सरकारकडून आक्षेप घेत सिंगापूरच्या राजदूताला समन्स

  • भारताने यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे ? जे वास्तव आहे, तेच सिंगापूरच्या पंतप्रधानांनी सांगितले आहे. हे सत्य स्वीकारून त्यात भविष्यात कसा पालट करता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे ! – संपादक
  • ही स्थिती स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांतील राज्यकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक
सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग

नवी देहली – सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी त्यांच्या संसदेत बोलतांना  ‘नेहरूंच्या भारतात सध्या निम्म्या खासदारांवर गुन्हे नोंद आहेत’, असा उल्लेख केला. त्यावर भारताने आक्षेप नोंदवत परराष्ट्र मंत्रालयाने सिंगापूरचे भारतातील राजदूत सायमन वोंग यांना समन्स बजावला आहे. ‘सिंगापूरच्या पंतप्रधानांनी केलेली शेरेबाजी अनावश्यक असून आम्ही हे सूत्र त्यांच्याकडे उपस्थित केले आहे’, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

१. ‘वर्कर्स पार्टी’च्या माजी खासदाराविरुद्धच्या तक्रारींवरील समितीच्या अहवालावरील चर्चेच्या वेळी सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी म्हटले होते की, स्वतःच्या देशासाठी लढणारे आणि स्वातंत्र्य मिळवून देणारे बहुधा महान धैर्य, अफाट संस्कृती अन् उत्कृष्ट क्षमता असलेल्या अपवादात्मक व्यक्ती असतात. संघर्ष करत ते लोकांचे आणि देशाचे नेते होतात. यामध्ये डेव्हिड बेन-गुरियन्स आणि जवाहरलाल नेहरू हे आहेत. नेहरूंचा भारत आता असा झाला आहे की, माध्यमांच्या वृत्तानुसर लोकसभेतील जवळपास निम्म्या खासदारांवर बलात्कार आणि हत्या या आरोपांसह गुन्हेगारी प्रकरणे प्रलंबित आहेत. अर्थात् यांपैकी अनेक आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले जाते.

२. पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी ‘जर सरकारमधील लोकांनी अखंडता राखली आणि प्रत्येकासाठी समान नियम अन् मानके समानपणे लागू केली, तर सिंगापूरचे लोक त्यांचे नेते, यंत्रणा आणि संस्था यांवर विश्‍वास ठेवू शकतात’, असेही सांगितले.