लावण्याला न्याय मिळावा, यासाठी ‘अभाविप’कडून ‘रस्ता बंद’ आंदोलन !

तमिळनाडूमधील लावण्या हिच्या आत्महत्येचे मुंबई आणि पालघर येथे पडसाद !

वसई रेल्वेस्थानकाच्या बाहेर ‘रस्ता बंद’ आंदोलन करतांना ‘अभाविप’ चे युवक-युवती

मुंबई – तमिळनाडूमध्ये तंजावर जिल्ह्यातील ‘सेक्रेड हार्ट’ या उच्च माध्यमिक शाळेतील ख्रिस्ती शिक्षक धर्मांतरासाठी करत असलेल्या बळजोरीमुळे एम्. लावण्या या हिंदु विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ‘या हिंदु विद्यार्थिनीला न्याय मिळावा’, यासाठी १७ फेब्रुवारी या दिवशी वसई (जिल्हा पालघर) रेल्वेस्थानकाच्या बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविपच्या) वतीने ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात ‘अभाविप’चे जिल्हा संघटनमंत्री वैभव सोलनकर यांसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रकरणी १५ फेब्रुवारी या दिवशी शीव (मुंबई) येथेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. ‘लावण्या’ ख्रिस्ती होत नसल्यामुळे मागील २ वर्षांपासून शाळेतील ख्रिस्ती शिक्षिका तिला शौचालय स्वच्छ करणे, झाडू मारणे, भांडी धुवायला लावणे अशी कामे करायला सांगून तिचा मानसिक छळ करत होत्या. या त्रासाला कंटाळून लावण्या हिने विषप्राशन करून आत्महत्या केली. ‘लावण्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यावर उतरून संघर्ष करू’, अशी चेतावणी ‘अभाविप’कडून देण्यात आली आहे.