शिरदवाड (जिल्हा कोल्हापूर) – घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्यासाठी प्रथम जिजाऊमाता सिद्ध व्हायला हव्यात. त्यासाठी हिंदु माता-भगिनी आणि बांधव यांनी धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे. हिंदूसंघटन करण्यासाठी छत्रपती शिवरायांप्रमाणे शक्ती आणि शौर्यासमवेत भगवंताचे अधिष्ठान मिळण्यासाठी भक्ती करणे महत्त्वाचे आहे. तरी स्वरक्षणासमवेत धर्माचरण करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी केले. शिरदवाड येथील युवक स्वरक्षण शौर्यजागृती वर्गाच्या समारोपीय सत्रात त्या बोलत होत्या.
धर्मप्रेमी श्री. ओंकार आरेकर, कीर्तनकार श्री. दीपक बरगले आणि श्री. प्रथमेश पगडे या युवकांच्या पुढाकारातून शिरदवाड येथील शिवमंदिर येथे चालू झालेल्या ७ दिवसांच्या शौर्यवर्गाची सांगता रथसप्तमी दिवशी झाली. या शिबिराचा लाभ अनेक युवकांनी घेतला, तर समारोपीय सत्रासाठी गावातील ४५ धर्मप्रेमींची उपस्थिती होती. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश शेटे यांनी ‘हिंदु राष्ट्रवीर’ ही संकल्पना विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. प्रथमेश गावडे यांनी केले.
धर्मप्रेमी युवकांनी व्यक्त केलेले मनोगत
१. श्री. ओंकार आरेकर – या वर्गातून पुष्कळ शिकायला मिळाले. आता पुढे आठवड्यातून किंवा १५ दिवसांतून एकदा तरी हा वर्ग प्रत्यक्ष व्हायला हवा.
२. कीर्तनकार श्री. दीपक बरगले – शिव मंदिराच्या भूमीवर भजन, शौर्य वर्ग अशाच गोष्टी घडतील. काही कीर्तनकारांनी नमस्काराची चुकीची पद्धत सांगितली होती; मात्र आता योग्य पद्धत समजल्याने यापुढे ती सांगेन. या वर्गामुळे धर्माचा पाया आम्हाला समजला. आम्ही अशी ग्वाही देतो की, धर्मासाठी सर्व तरुण आत्मियतेने एकत्र कार्य करू.
३. श्री. प्रथमेश पगडे – इतर युवकांना शिकवण्यासाठी प्रयत्न करीन.
४. सौ. सुनिता आरेकर – माझा मुलगा समाजातील इतर युवकांपेक्षा प्रशिक्षणासह धर्मकार्य करत असल्याचे पाहून अभिमान वाटतो. हे राष्ट्र-धर्मकार्य आणि युवक संघटन त्याने केलेच पाहिजे.
धर्मप्रेमींचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न
१. ‘हलाल जिहाद’चा विषय युवकांनी जिज्ञासेने ऐकला. या वेळी ‘आम्ही तो रोखण्यासाठी प्रयत्न करू’, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
२. गुढीपाडवा शुभेच्छापत्राचे महत्त्व सांगितल्यावर सर्व युवकांनी मिळून १४१ शुभेच्छापत्रांची मागणी दिली.
३. कीर्तनकार दीपक बरगले यांनी यांनी गावातील मुख्याध्यापक, सरपंच अशांसमोर प्रशिक्षण उपक्रमाचे महत्त्व सांगून गावात वर्ग चालू करण्याविषयी त्यांना प्रवृत्त केले.
४. अर्पणाचे महत्त्व समजल्यावर एका धर्मप्रेमीने ५० किलो धान्य अर्पण दिले. यातून प्रेरणा घेऊन इतर प्रशिक्षणार्थिंनी १२० किलो धान्य अर्पण मिळवले.