मुंबईत ईडीचे धाडसत्र, गुंड दाऊद आणि राजकारणी यांच्यातील संपत्तीच्या कराराविषयी कारवाई !

मुंबई – ईडीचा (अंमलबजावणी संचालनालय) अपवापर होत असल्याच्या आरोपांवरून शिवसेनेने पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती; मात्र त्यापूर्वीच १५ फेब्रुवारी या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईत धाडसत्र चालू केले आहे. गुंड दाऊद इब्राहीमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराशी निगडीत हे धाडसत्र आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर संचालनालयाने ही कारवाई चालू केली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणासुद्धा संचालनालयाला या कारवाईसाठी साहाय्य करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही धाडसत्रे ‘सी’ प्रभागात टाकण्यात आली आहेत. गुंड दाऊद इब्राहिमच्या १० मालमत्तांवर धाड टाकण्यात आली आहे. दाऊदची बहीण हसीना पारकर आणि भाऊ इक्बाल कासकर यांच्या मुंबईतल्या घरी ईडीचे पथक पोहोचले आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला कह्यात घेऊन आणखी पडताळणी करण्यात येणार आहे. या धाडसत्रानंतर काही नेते अडचणीत येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.