वर्ष १९९६ मध्ये (कै.) सौ. नीता सदाशिव सिंगबाळ यांना मेंदूचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांचे शस्त्रकर्म झाले. वर्ष २०१४ मध्ये ‘त्यांच्या मेंदूमध्ये फुगलेली रक्तवाहिनी (Aneurysm) आहे’, असे निदान झाले. त्यामुळे त्यांचे पुन्हा शस्त्रकर्म करावे लागले. त्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला आणि ३१.१.२०२२ या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांच्या लहान बहिणी आधुनिक वैद्या (डॉ.) रूपाली भाटकार आणि आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. लिंदा बोरकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या आजारपणात, निधनाच्या वेळी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. निर्मळ स्वभाव : ‘माई ((कै.) सौ. नीता सदाशिव सिंगबाळ) कधीच दुसर्याविषयी टीकात्मक बोलत नसे आणि कुणाची ईर्ष्याही करत नसे. तिला कुणी दुखावले, तरी ती त्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्याशी चांगलीच वागत असे.
१ आ. प्रेमभाव
१. एकदा आमची आई (श्रीमती पद्मा भाटकार (वय ८९ वर्षे)) काही कारणानिमित्त अमेरिकेला गेली होती. तेव्हा माई गरोदर असतांनाही प्रतिदिन आमच्या घरी येऊन आमच्यासाठी स्वयंपाक बनवायची आणि मग कामावर जायची.
२. ती केवळ कुटुंबातीलच व्यक्तींवर नव्हे, तर सगळ्यांवर प्रेम करत असे. साधक सत्संगासाठी घरी आल्यावर ती त्यांना चहा आणि खाऊ देत असे.
३. घरी येणारा ‘पोस्टमन’ किंवा भाजीवाली यांनाही ती नियमित चहा आणि खाऊ देत असे.
४. कोलकात्याचा एक साडीवाला माईकडे नेहमी यायचा. माई आजारी पडल्यावर ती मुंबईतील ज्या रुग्णालयात भरती होती, त्या रुग्णालयात तो तिला भेटायला आला होता.
१ इ. इतरांचा विचार करणे : ती अधिकोषात नोकरीला लागली. तेव्हा तिने अधिकोषात आम्हा दोघींचे खाते उघडले आणि आमच्या पुढच्या शिक्षणासाठी ती त्यात प्रत्येक मासाला पैसे भरत असे. त्या पैशांचा तिने कधीच स्वतःसाठी उपयोग केला नाही.
१ ई. इतरांना निरपेक्षपणे साहाय्य करणे : ती जेथे नोकरी करत होती, तेथे जवळच असलेल्या फुलवालीला साहाय्य व्हावे; म्हणून माई तिच्याकडून फुलांच्या वेण्या विकत घेत असे. माईने तिच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता तिचे अधिकोषात खाते उघडून देऊन तिला स्वावलंबी केले.
१ उ. लहानपणापासूनच देवाची भक्ती करणे : लहानपणापासून माई देवाची भक्ती करत होती. ती निष्ठेने कर्मकांड करत असे. वर्ष १९९२ पासून ती सत्संगाला जायला लागली आणि तिने कुलदेव श्री मंगेशाचे नामस्मरण चालू केले.
१ ऊ. तिची प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा होती.
२. आजारपण
२ अ. गंभीर आजारपणाला साधनेमुळे खंबीरपणे सामोरे जाणे आणि ते ‘प्रारब्धभोग’ म्हणून स्वीकारणे : वर्ष १९९६ मध्ये तिची प.पू. गुरुदेवांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) भेट झाली. त्याच वर्षी सप्टेंबर मासात तिला मेंदूचा कर्करोग झाला आणि देवाच्या कृपेने मुंबईच्या एका तज्ञ ‘न्यूरो सर्जन’ने (मेंदूचे शस्त्रकर्म करणार्या तज्ञांनी) तिचे शस्त्रकर्म केले. ती हळव्या स्वभावाची असूनही साधनेमुळे खंबीर राहू शकली. ती एकदाही निराशेने रडली नाही. तिने तिचे प्रारब्ध धैर्याने स्वीकारले.
२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती ! : तिच्या शस्त्रकर्मानंतर आम्ही मुंबई येथील आमच्या कौटुंबिक मित्रांकडे तिच्या ‘रेडिएशन’च्या (कर्करोगावरील किरणोत्सर्गाच्या) उपचारांसाठी थांबलो होतो. तेथे प.पू. गुरुदेव आणि डॉ. (सौ.) कुंदाताई (डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले) तिला प्रेमाने भेटायला आले होते. नंतर त्यांनी आमच्या कुटुंबाला मुंबईतील सेवाकेंद्रात जेवायला बोलावून पुष्कळ प्रेम दिले.
२ इ. तिच्यावर उपचार करणार्या आधुनिक वैद्यांनी ‘ती केवळ ६ मासच जगेल’, असे सांगितले होते; परंतु देवाच्या कृपेने वर्ष १९९६ पासून वर्ष २०१४ पर्यंत तिची प्रकृती चांगली राहिली.
३. प्रकृती बरी झाल्यावर सेवा करणे
ती अधिकोषात नोकरी करायची; परंतु आजारपणामुळे तिने नोकरीतून निवृत्ती घेतली. तिची प्रकृती थोडी चांगली झाल्यावर तिने सेवा करायला आरंभ केला. तिने ‘विज्ञापने गोळा करणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे आणि गुरुपौर्णिमेला अर्पण घेणे’ आदी सेवा केल्या. तिच्या घरी सनातनचा सत्संग होत असे. ती सोफा, गाडी आदी वस्तू सनातन संस्थेच्या कार्यक्रमासाठी वापरायला देत असे.
४. शेवटच्या आजारपणात पुष्कळ त्रास होत असतांनाही त्याविषयी गार्हाणे न करणे
शेवटी आजारपणात ‘तिला बोलता न येणे आणि अन्न गिळता न येणे’, असे त्रास होत होते. तेव्हा तिने कधीच ‘मला पुष्कळ त्रास होतो किंवा मला जीवनाचा कंटाळा आला आहे’, असे म्हटले नाही. आम्ही तिला ‘तुला त्रास होतो का ?’, असे विचारले, तर ती ‘नाही’, असे मान हालवून सांगायची. ‘श्री गुरूंनी तिला दुःखाची झळ लागू दिली नाही’, असे आम्हाला वाटते.
५. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे
अ. ती जेव्हा हळूहळू बेशुद्ध होत गेली, तेव्हा मधे मधे तिची दृष्टी प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे जात होती.
आ. आम्ही तिच्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करायचो. त्या वेळी बर्याचदा ती बेशुद्ध असूनही तिच्या डोळ्यांतून भावाश्रू येत असत.
६. निधनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे
अ. ज्या वेळी तिचे निधन झाले, त्याच वेळी मी तिचा हात धरून तिला भक्तीसत्संगात लावलेली काही भक्तीगीते ऐकवली. त्या वेळी ‘ती त्यातून चैतन्य ग्रहण करत आहे’, असे आम्हाला वाटले.
आ. तिच्या देहावसानाच्या वेळी तिचा तोंडवळा शांत होता.
७. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
अ. तिचे निधन झाल्यानंतर ‘ती शांत झोपली आहे आणि तिच्या पापण्यांची हालचाल होत आहे’, असे आम्हाला वाटत होते.
आ. ती झोपत असलेल्या खोलीत आणि तिच्या पलंगाजवळ गेल्यानंतर शांत वाटते अन् आपोआप नामजप चालू होतो.’
– आधुनिक वैद्या (डॉ.) रूपाली भाटकार आणि आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. लिंदा महारुद्र बोरकर (लहान बहिणी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.२.२०२२)
‘श्री. सदाशिव सिंगबाळ ((कै.) (सौ.) नीता सिंगबाळ यांचे पती, वय ६६ वर्षे) यांनी पत्नीच्या गंभीर आजारपणात तिची निष्ठेने आणि आनंदाने सेवा केली. ती सकारात्मक रहाण्यात त्यांचा पुष्कळ मोठा वाटा होता.’ – आधुनिक वैद्या (डॉ.) रूपाली भाटकार आणि आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. लिंदा महारुद्र बोरकर (लहान बहिणी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.२.२०२२) |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक