छत्रपती संभाजीनगर येथे ‘उत्तम उपाहारगृहा’वर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई !

परवाना निलंबित !

अन्न व औषध प्रशासनाद्वारे कारवाई करण्यात आलेले उत्तम उपाहारगृह

छत्रपती संभाजीनगर – शहरातील अतिशय जुन्या आणि ‘इमृती’साठी प्रसिद्ध असलेल्या ‘मे. उत्तम उपाहारगृहा’वर अन्न व औषध प्रशासनाने (‘एफ्.डी.ए.’ने) २३ जुलै या दिवशी धाड घातली. यामध्ये तेथे अस्वच्छता आणि गटाराच्या शेजारीच अन्न शिजवले जात असल्याने या आस्थापनाचा परवाना तातडीने निलंबित केला असून दुकान बंद करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

‘एफ्.डी.ए.’च्या पथकाने स्वयंपाकघराची पहाणी केली असता तिथे अत्यंत विदारक चित्र समोर आले. इडलीचे पीठ थेट उघड्या गटाराच्या लाईनजवळ उघड्यावर आंबवण्यासाठी ठेवले होते. अन्न शिजवण्याच्या जागी झुरळांचा मुक्त वावर होता. भिंतींवर काळपट थर, जळमटे आणि तंबाखूच्या पिचकार्‍या मारलेल्या आढळल्या. तळणासाठी तेच तेल वारंवार वापरले जात होते.

केवळ उपाहारगृहाचा परवाना असतांना मिठाईचे व्यावसायिक उत्पादन केले जात होते, तसेच २५ ते ३० कामगारांचे कोणतेही आरोग्यविषयक चाचणी प्रमाणपत्र नव्हते.

संपादकीय भूमिका

  • खाद्यपदार्थांच्या संदर्भातील हलगर्जीपणा पहाता अन्न व औषध प्रशासनाला प्रतिदिन धाडी घालत रहाव्या लागणार, हे निश्चित !
  • अन्नाच्या नावाने ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या अशा उपाहारगृहांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !