Assam Flood : आसाममध्ये महापूर :  ४१ जणांचा मृत्यू !

९०० हून अधिक गावे पाण्याखाली !

गौहत्ती (आसाम) – आसाममध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. ब्रह्मपुत्रा नदी आणि तिच्या उपनद्या यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने राज्यातील २५ जिल्ह्यांतील ९०० हून अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील अनेक भागांत रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. या पुरामुळे ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. २२ जुलैच्या संध्याकाळपर्यंत ९९० लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. या संकटाच्या काळात राज्य सरकार, सैन्यदल, ‘राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल’ ( एन्.डी.आर्.एफ्.) आणि ‘राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल’ ( एस्.डी.आर्.एफ्.) यांच्या पथकांनी युद्धपातळीवर साहाय्यकार्य चालू केले आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन जल राहत’ अंतर्गत मदत आणि बचाव मोहीम तीव्र केली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, आपद्ग्रस्तांना साहाय्य आणि बचावकार्य हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मुख्यमंत्र्यांनी पुरामध्ये प्राण गमावलेल्या लोकांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांच्या आर्थिक साहाय्याची घोषणा केली आहे.