एकदाच वापरायच्या प्लास्टिकवर १ जुलै २०२२ पासून बंदी !

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – पर्यावरणाला हानी पोचवणार्‍या एकदाच वापरायच्या प्लास्टिकवर १ जुलै २०२२ पासून बंदी घालण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन, साठवणूक, वितरण आणि वापर यांच्याशी संबंधित सर्व संस्थांना नोटीस पाठवली आहे. यात ३० जूनपूर्वी एकदाच वापरायच्या प्लास्टिकवर बंदीची सिद्धता पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. या नोटिशीत, ‘नियमांचे उल्लंघन करणार्‍यावर कठोर कारवाई केली जाईल’, अशी चेतावणीही देण्यात आली आहे. यात उत्पादन जप्त करणे, पर्यावरणाची हानी केली; म्हणून दंड आकारणे, तसेच त्यांच्या उत्पादनाशी संबंधित उद्योग बंद करणे, यांसारख्या कारवाईचा समावेश आहे.

कशावर येणार बंदी ?

प्लास्टिकचे झेंडे, कँडी स्टिक (काडी), आईसक्रिम स्टिक (काडी), सजावटीसाठी वापरले जाणारे थर्माकोल, चमचे, ‘इअरबड्स’ आदींचा समावेश आहे. यासह प्लास्टिक कप, ताटल्या, पेले, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे यांसारख्या कटलेरी वस्तू, मिठाईच्या डब्यांवर लावले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिकच्या निमंत्रण पत्रिका, १०० मायक्रॉनपेक्षा अल्प जाडी असलेले पीव्हीसी फलक आदींचाही यात समावेश असणार आहे.