ओडिशातील एका गावात सरपंच पदासाठी निवडणूक लढवत असलेल्या उमदेवारांची गावकर्‍यांनी घेतली लेखी आणि तोंडी परीक्षा !

८ उमेदवारांपैकी केवळ ३ उमेदवार उत्तीर्ण !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर मतदारांमध्ये अशा प्रकारची जागृती आली, हे कौतुकास्पद असले, तरी ती केवळ एकाच गावात आली आहे, हे भारतियांना लज्जास्पदच होय ! – संपादक

राऊरकेला (ओडिशा) – ओडिशा राज्यातील पंचायत निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. याच संदर्भात सुंदरगड जिल्ह्यातील मालूपाडा गावातील नागरिकांनी सरपंच पदासाठी निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांची एक लेखी आणि तोंडी परीक्षा घेतली. या परीक्षेचा उद्देश ‘हे उमेदवार नागरिकांच्या समस्या दूर करण्याविषयी किती गंभीर आहेत ?, हे जाणून घेणे’, हा होता. या परीक्षेमध्ये अनेक उमेदवारांना गावकर्‍यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देतांना नाकीनऊ आल्याचे दिसून आले. एकूण ८ उमेदवारांपैकी ५ उमेदवार यात अनुत्तीर्ण, तर केवळ ३ जण उत्तीर्ण झाले. येथे १८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मालूपाडा हे आदिवासींचे गाव असून येथे अनेक वर्षे विकास झालेला नाही.
गावकर्‍यांनी येथे एका समितीची स्थापना केली आहे. या समितीची प्रत्येक आठवड्याला बैठक होते आणि त्यात गावातील समस्यांवर उपाय काढण्यासाठी चर्चा केली जाते. यात सरपंचाची भूमिका महत्त्वाची असल्याने समितीने सरपंच पदासाठी निवडणूक लढवणार्‍यांची परीक्षा घेण्याचे ठरवले होते.

गावकर्‍यांनी उमेदवारांना विचारलेले प्रश्‍न

१. सरपंच पदाचा उमेदवार बनण्यामागील तुमचे ५ उद्देश सांगा ?

२. सरपंच बनल्यानंतर तुम्ही ५ वर्षांत कोणकोणती कामे करणार ?

३. निवडणुकीत उभे रहाण्यापूर्वी केलेली जनसेवेची ५ कामे सांगा ?

४. आता घरोघर जाऊन फिरत आहात, तसे निवडणूक जिंकल्यानंतर फिरणार आहात का ?

५. तुम्ही तुमच्या पंचायतीला कसे बनवण्याचे स्वप्न पहाता ?

६. तुमच्या पंचायतीमध्ये किती प्रभाग आहेत आणि किती लोकसंख्या आहे ?