हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील दोषी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा !

हिंगणघाट येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निर्णय

विकेश नगराळे

वर्धा – हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे हिला भर चौकात पेट्रोल टाकून जाळून मारणारा नराधम विकेश नगराळे याला न्यायालयाने १० फेब्रुवारी या दिवशी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २ वर्षांपूर्वी घडलेल्या जळीत प्रकरणात मृत्यूशी झुंज देणार्‍या अंकिता पिसुड्डे हिचा १० फेब्रुवारी २०२० या दिवशी नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेला २ वर्षे पूर्ण झाली असून तिच्या दुसर्‍या स्मृतीदिनी लागणार्‍या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अंतिम सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाची बाजू मांडतांना अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी अनेक दाखले देत आरोपीला कठोर मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती.

१. आपल्याशी विवाह न केल्यास ठार मारण्याची धमकी आरोपीने अंकिताला दिली होती. ३ फेब्रुवारी २०२० या दिवशी पीडिता अंकिता बसमधून उतरल्यावर नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असतांना आरोपी विकेश नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कार्यालयीन कामकाजाच्या १९ दिवसांत ४२६ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात ६४ सुनावण्या घेत २९ साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आले आहेत. आरोपीचा विवाह झाला असून त्याला २ वर्षाचे लहान बाळ आहे. आई-वडील यांचेही दायित्व आहे, त्यामुळे विकेश नगराळेवर दया दाखवावी, असा युक्तिवाद आरोपीचे अधिवक्ता भुपेंद्र सोनी यांनी केला होता.

२. ३ फेब्रुवारी २०२० या दिवशी दोषी नगराळे याला अटक करण्यात आली होती; पण या २ वर्षांच्या कालावधीची त्याला शिक्षेत सूट मिळणार नाही. शिवाय त्याला ५ सहस्र रुपयांचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सुनावला आहे, अशी माहिती सरकारी पक्षाचे अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.