१० फेब्रुवारी ते ७ मार्च या काळात ‘एक्झिट पोल’च्या प्रकाशनास बंदी !

पणजी – निवडणूक आयोगाने १० फेब्रुवारी ते ७ मार्च या काळात ‘एक्झिट पोल’ (मतदानानंतरचा अंदाज) कार्यक्रम आयोजित करण्यास आणि प्रकाशित करण्यास बंदी घातली आहे. ५ राज्यांतील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयोगाने म्हटले आहे की, १० फेब्रुवारी या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून ७ मार्च या दिवशी संध्याकाळी ६.३० पर्यंत या वेळेत मतदानासंदर्भातील अंदाजासंबंधी कार्यक्रम आयोजित करणे आणि वृत्तपत्रे किंवा वाहिनीद्वारे प्रकाशित करणे किंवा प्रसिद्ध करणे प्रतिबंधित असेल. संबंधित मतदान क्षेत्रामध्ये मतदान संपण्यासाठी निश्चित केलेल्या ४८ घंट्यांच्या कालावधीत ‘ओपिनियन पोल’(मतदानाचा कल) किंवा इतर कोणत्याही मतदान सर्वेक्षणाच्या निकालांसह निवडणूक निकालाशी संबंधित कोणतीही घटना प्रदर्शित करण्यास मनाई असेल. याचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीला दोन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.