मिरज, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – तेजोपासना परिवार आंतरराष्ट्रीय योगसाधनावर्ग आयोजित १ लाख सूर्यनमस्कार संकल्पपूर्ती सोहळा मिरज येथील ऑक्सिजन पार्क परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ, ‘स्वस्थियोग प्रतिष्ठान’चे कुटुंबप्रमुख डॉ. जी.एस्. कुलकर्णी होते. या कार्यक्रमास ‘केमिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. विशाल दुर्गाडे, भाजप नगरसेवक श्री. पांडुरंग कोरे, मेंदूशल्य चिकीत्सातज्ञ डॉ. संजीव कुलकर्णी, पत्रकार श्री. मोहन वाटवे, ‘प्रवीण बिल्डकॉन’चे श्री. प्रणव पटवर्धन यांसह अन्य उपस्थित होते.
डॉ. जी.एस्. कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. तेजोपासना परिवाराच्या वतीने श्री. मकरंद खाडिलकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. यानंतर योगवर्गातील नियमित साधकांनी सूर्यनमस्कार घातले. प्रशिक्षक श्री. मकरंद खाडिलकर यांनी या वेळी आसंदीत बसून घालता येणार्या सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखवले. १०० हून अधिक साधक सूर्यनमस्कार घालण्याच्या उपक्रमात सहभागी झाले होते. वर्षभरात १ लाख सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व साधकांचे मकरंद खाडिलकर यांनी आभार मानले, तसेच योग आणि सूर्यनमस्कार यांचे लाभ समजावून सांगितले. निरोगी आरोग्य आणि सुदृढ शरीर यांसाठी सूर्यनमस्कार हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.