संपादकीय
हिंदूंना ‘धर्म चार भिंतींत ठेवा’, असा सल्ला देणारे हिजाब प्रकरणाविषयी गप्प का ?
कर्नाटकमधील महाविद्यालयीन धर्मांध विद्यार्थिनींचा हिजाब परिधान करण्याचा अनाठायी अट्टहास आणि त्यास होणारा विरोध, यांमुळे सध्या देशभरातील वातावरण दिवसेंदिवस ढवळून निघत आहे. या वादाला आरंभ अर्थात्च धर्मांधांनी केला. आतापर्यंत कर्नाटकमधील काही भागांपुरता मर्यादित राहिलेल्या या हिजाब वादाने राज्याचीच नव्हे, तर देशाचीही सीमा ओलांडली आहे. पाकसारख्या संधीसाधू देशाने नेहमीप्रमाणे यात नाक खुपसले आहे. पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ‘मुसलमान मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे, हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. कुणालाही हा मूलभूत अधिकार नाकारणे, तसेच हिजाब घातल्यासाठी घाबरवणे, हे अन्याय्य आहे. जगाने याकडे लक्ष दिले पाहिजे’, अशा आशयाची ‘टिव टिव’ केली. वास्तविक भारताने पाकला भारताच्या अंतर्गत प्रश्नात नाक न खुपसण्याचा सज्जड दम द्यायला हवा होता; पण तसे झालेले नाही. खरे तर असे सल्ले द्यायला पाकला लाज वाटायला हवी होती. पाकमध्ये तेथील अल्पसंख्य हिंदूंवर प्रतिदिन होणारे अमानुष अत्याचार, अपहरण, हिंदु महिलांवरील बलात्कार, धर्मांतर आणि हत्या, मंदिरांची तोडफोड यांची प्रकरणे आता जगाच्या चव्हाट्यावर आली आहेत. सध्या पाकमध्ये अल्पसंख्य शब्दालाही लाजवेल, इतके अल्प हिंदू राहिले आहेत. असे असतांना पाक भारताला कोणत्या तोंडाने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे सल्ले देत आहे ?
दुसरीकडे नोबेल शांतता पारितोषिक तथा महिला अधिकार कार्यकर्ती मलाला युसूफझाई हिनेही कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावरून ‘भारतीय नेत्यांनी मुसलमान महिलांकडे दुर्लक्ष करणे थांबवले पाहिजे’, अशी गरळओक केली. तिला नोबेलसारखा फुटकळ पुरस्कार मिळाल्याने तिच्या विधानाला एवढे महत्त्व आले. मलालाने भारतियांना हा सल्ला देण्यापूर्वी पाकमधील हिंदु महिलांवर होणार्या अमानवी अत्याचारांविषयी कधी ‘ब्र’तरी काढला आहे का ? ज्या मुलीला पाकमध्ये तेथील पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिला अधिकाराचे कामही करता आले आणि जी आतंकवाद्यांच्या भीतीने दुसर्या देशात पळून गेली, तिने भारतियांना असा सल्ला देणे हास्यास्पद आहे. ही तीच मलाला युसूफझाई आहे, जी अन्य महिलांच्या जाऊ देत; पण स्वतःच्याही अधिकारांचे रक्षण कधीही करू शकलेली नाही. केवळ सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन नोबेल पुरस्कार जिंकला, म्हणून वास्तव पालटत नाही, हे मलाला हिला कुणीतरी सांगितले पाहिजे. एकूणच कर्नाटक राज्यातील एका छोट्या भागातील प्रकरण ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवून भारताची, म्हणजे हिंदूंची अपकीर्ती केली जात आहे आणि अल्पसंख्य मुसलमानांविषयी सहानुभूती मिळवली जात आहे, त्यालाच ‘टूलकिट’ (टूलकिट म्हणजे एखाद्याला लक्ष्य करण्यासाठी संघटितपणे निश्चित केलेले कृतीचे टप्पे) म्हणतात. अशा वेळी भारतातील धर्मांध, पुरोगामी, काँग्रेसी, साम्यवादी, समाजवादी, नास्तिकतावादी, तथाकथित विचारवंत, लेखक, चित्रपट कलाकार, बहुतांश सर्व वर्तमानपत्रे आदी या ‘टूलकिट’चा एक भाग असतात. या हिंदुद्वेषी टूलकिटचा सामना हिंदू कसा करणार आहेत ?
हे शिक्षणाचे इस्लामीकरण !
काही मासांपूर्वी मंदिरात महिलांनी मंदिरांत तोकडे कपडे घालून येऊ नये, यासाठी त्यांच्यासाठी वस्त्रसंहिता लागू केली होती. याविरुद्ध पुरोगाम्यांनी रणकंदन माजवले. महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची ओरड करत त्यांनी हिंदूंना प्रतिगामी, रूढीप्रिय आणि स्त्रीविरोधी ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तथापि हीच मंडळी कर्नाटकमधील महाविद्यालयांतील हिजाबच्या प्रकरणावरून गप्प का आहेत ? त्यांना आता धर्मांध विद्यार्थिनींची ही कृती प्रतिगामी किंवा रूढीप्रिय वाटत नाही का ? एकीकडे स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली मंदिरांत हिंदु महिलांना पूर्ण कपडे घालायला एक प्रकारे विरोध करायचा, तर दुसरीकडे धर्मांध विद्यार्थिंनींना पूर्ण कपडे घालण्याला समर्थन द्यायचे ! हा निवळ दुटप्पीपणा आहे. अशा प्रकारे पुरोगामी त्यांच्या हिंदुद्वेषी भूमिकेमुळे सातत्याने तोंडावर आपटत असतात. मध्यंतरी काही राज्यशासनांनी शाळांतून श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याचा निर्णय घेतला. यावरही पुरोगामी तुटून पडले आणि त्यांनी ‘शिक्षणाचे भगवेकरण होत आहे’, अशी ओरड केली. तथापि याच पुरोगाम्यांना आता कर्नाटकातील शेकडो धर्मांध विद्यार्थिनी महाविद्यालयात हिजाब घालण्यावर अडून बसल्या असतांना ‘शिक्षणाचे इस्लामीकरण’ होत असल्याचे का वाटत नाही ?
पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा येथेच थांबत नाही, तर कॉन्व्हेंट शाळांमधून जेव्हा हिंदु मुलांना टिळा लावू दिला जात नाही, तसेच हिंदु मुलींना कुंकू लावणे, बांगड्या घालणे, या हिंदु संस्कृतीतील प्रथा-परंपरा पाळू दिल्या जात नाहीत, तेव्हाही या पुरोगाम्यांची दातखिळी बसलेली असते. यास जर हिंदूंनी विरोध केला, तर हेच पुरोगामी हिंदूंना ‘धर्म घरातील चार भिंतींच्या आत ठेवला पाहिजे’, असा शहाजोकपणाचा सल्ला देतात; परंतु हाच सल्ला हिजाबधारित धर्मांध विद्यार्थिनींना देण्यास त्यांची जीभ कचरते. हिजाबचा आग्रह धरण्यामागे ‘या मुलींनी हिजाब परिधान केला नाही, तर त्यांचे पालक त्यांना महाविद्यालयात पाठवणार नाहीत’, असे कारण दिले जाते. पुरोगाम्यांना धर्मांधांची ही भूमिका प्रतिगामी वाटत नाही का ? एरव्ही ऊठसूठ हिंदूंना लक्ष्य करणारे जावेद अख्तर, शबाना आझमी यांच्यासारखे लोक या प्रकरणी सोयीस्कर मौन का बाळगतात ? जर हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करण्यावर धर्मांध विद्यार्थिनी ठाम रहात असतील आणि संपूर्ण देश डोक्यावर घेत असतील, तर सर्वत्रच्या हिंदूंनीही शाळा-महाविद्यालयांत हिंदु प्रथा-परंपरा जपल्या जाण्यासाठी आग्रही रहाण्यात चूक काय ? जसे रुग्णाला शस्त्रकर्म विभागात रुग्णालयाकडून देण्यात येणारे कपडेच परिधान करावे लागतात, तेथे रुग्णाच्या मनाला वाटेल ते कपडे तो परिधान करू शकत नाही, तसाच नियम शाळेच्या संदर्भातही आहे. त्यामुळे शाळेचे नियम पाळणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक आहे. तरीही ज्यांना देशात अशांतताच पसरवायची आहे, ते अशी काही ना काही कथा रचतच असतात आणि त्यापुढची पटकथा ‘टूलकिट’वाल्यांकडे सिद्धच असते !