फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे याने छत्रपती संभाजी महाराजांविषयी काढलेले गौरवोद्गार !

७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन आहे. त्यानिमित्ताने…

‘वर्ष १६७२ मध्ये भारतात आलेला ॲबे कॅरे हा फ्रेंच प्रवासी छत्रपती शंभूराजांविषयी लिहितो, ‘‘हा तरुण युवराज अत्यंत धाडसी आणि पित्याच्या कीर्तीला साजेसा शूर होता. पित्यासोबत तो अनेक मोहिमांवर गेला होता. युद्धकलेत अनुभवी सेनापतीच्या हाताखाली त्याला एवढे तरबेज करण्यात आले होते की, भल्याभल्या वयोवृद्ध सेनापतींशी तो बरोबरी करू लागला. अतिशय मजबूत बांध्याचा हा युवराज तेवढाच रूपवान होता. त्याचे सौंदर्य हा सैनिकांना त्याच्याकडे आकर्षित करणारा मोठा गुण ठरला. त्याचे सैनिक त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतकाच मान देत. एवढेच नव्हे, तर शंभूराजांच्या नेतृत्वाखाली युद्ध करण्यात त्यांना धन्यता वाटे. आपल्या कर्तबगारीचे सारे श्रेय ते या युवराजाला देत. कुणीही कर्तबगारी दाखवली की, शंभूराजे त्याचे कौतुक करत आणि त्याला बक्षीस देऊन त्याच्या कर्तृत्वाचे चीज करत. ज्यांच्यावर हा युवराज स्वारी करणार होता, ते त्याचे नाव ऐकताच पळून जात. त्यामुळे या युवराजाला यश आणि कीर्ती मिळवणे सोपे गेले. थोड्याच अवधीत त्याने बराच मुलुख स्वराज्यास जोडला. या युवराजाचे सर्वदूर एवढे नाव आहे की, त्याच्या पित्यानेही त्याचा हेवा करावा.’


छत्रपती संभाजी महाराजांचे धर्मांतराच्या विरोधातील कठोर धोरण !

‘मराठे आणि इंग्रज यांच्यात वर्ष १६८४ मध्ये जो तह झाला, त्यात छत्रपती संभाजी महाराजांनी एक अट घातली होती, ती अशी, ‘इंग्रजांनी माझ्या राज्यातून ख्रिश्चन धर्मात बाटवण्यासाठी माणसांना विकत घेण्यास परवानगी नाही.’

(साभार : ‘शिवपुत्र संभाजी’, लेखिका – डॉ. (सौ.) कमल गोखले)


‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘स्वराज्यासाठी कसे जगावे’ आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी ‘धर्मासाठी कसे मरावे’, याचा आदर्श घालून दिला !’

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.