४०० कोटी रुपये मूल्याची अष्टधातुपासून बनलेली जगातील सर्वांत उंच मूर्ती
भाग्यनगर (तेलंगाणा) – भारतात प्रथमच समतेचा संदेश देणारे वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामी यांची ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ (समानतेचे प्रतीक असलेला पुतळा) नावाची २१६ फूट उंचीची मूर्ती पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वसंत पंचमीच्या मुहूर्तावर राष्ट्राला समर्पित करण्यात आली. ही अष्टधातुपासून बनलेली जगातील सर्वांत मोठी मूर्ती आहे. ‘गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये या मूर्तीचा समावेश करण्यात आला आहे. सुमारे १ सहस्र कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या भव्य रामानुजाचार्य मंदिराच्या वर ही मूर्ती बसवण्यात आली आहे. रामानुजाचार्यांची दुसरी मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली असून ही मूर्ती १२० किलो सोन्याची आहे. संत रामानुजाचार्य स्वामी यांच्या जन्माला १००१ वर्षे पूर्ण झाली आहेत.
भाग्यनगरपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनगरमध्ये हे मंदिर बांधण्यात आले आहे. रामानुजाचार्य स्वामी हे पहिले संत आहेत, ज्यांची एवढी मोठी मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. ही मूर्ती चीनमध्ये बनवण्यात आली असून त्याची किंमत सुमारे ४०० कोटी आहे.